एक्स्प्लोर
आजीच्या उपचारात दिरंगाई, नातवाने रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मिलिंद राजू मेश्राम असं आहे. तो खात, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे. आपल्या आजीवर उपचार होत नसल्यामुळे हे कृत्य केल्याचं त्याने सांगितलं.

भंडारा : आपल्या आजीच्या उपचारात दिरंगाई होत असल्याचा राग मनात धरुन भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणाऱ्या नातवाला भंडारा पोलिसांनी शिताफीने अटक. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मिलिंद राजू मेश्राम असं आहे. तो खात, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे.
भंडारा पोलीस अधीक्षकांना आज सकाळी आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबईवरुन फोनद्वारे माहिती देण्यात आली, की मुंबई येथे एका अज्ञात इसमाने फोन करून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता बॉम्बशोधक पथक तयार करून भंडारा सामान्य रुग्णालयात शोधमोहिम सुरु केली. उपकरणाच्या सहाय्याने आणि श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढला. तरीही बॉम्ब सदृश वस्तू सापडली नाही.
ही माहिती केवळ अफवा असल्याने तशी सूचना मुंबईला देण्यात आली. त्यानंतर निनावी फोन करणाऱ्या इसमाचा शोध सुरु झाला. फोन नंबर मिळाल्यावर शोध घेतला असता संबंधित व्यक्ती नागपूर जिल्हाच्या मौदा तालुक्यातील खात येथील असल्याचं समोर आलं.
पोलिसांनी यानंतर सूत्र हलवली आणि मिलिंद राजू मेश्राम याला अटक केली. आपली आजी चार दिवसांपासून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहे. तिच्यावर योग्य उपचार होत नसल्याने आपण हे कृत्य केल्याचं मिलिंद मेश्राम याने कबूल केलं.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























