भांडणाचे मैत्रीत रूपांतर होणार का? ठाण्यात आघाडी घडवण्याची म्हस्के आणि परांजपे यांवर जबाबदारी
ठाण्यात महाआघाडी होणार हे निश्चित झाले असल्याने, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर, शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या खांद्यावर जागावाटपाचा फॉर्मुला ठरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
ठाणे : सर्व प्रसारमाध्यमांसमोर लसीकरणावरून जे कडाक्याचे भांडले, तेच आता महाआघाडीचा फॉर्म्युला ठरवणार आहेत. ठाण्यात महाआघाडी होणार हे निश्चित झाले असल्याने, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर, शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या खांद्यावर जागावाटपाचा फॉर्मुला ठरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत सामंजस्याने विचार होईल की पुन्हा भांडण होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षातील शहर प्रमुखांची चर्चेसाठी निवड करण्यात आली आहे. पण राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांच्यातले आता टोकाचे मतभेद सर्व ठाणेकरांना माहित आहेत. यावर "आमचे भांडण सर्वांनी पाहिले असले तरी आमची मैत्री देखील सर्व ठाणेकरांना माहिती आहे", असे नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. तर "राजकारणात कधीच कोणतेही वाद कायमसरूपी नसतात", असे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.
मागील निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांना 67 जागांवर विजय संपादीत करता आला होता. तर राष्ट्रवादीचे 35 आणि कॉंग्रेसचे तीन नगरसेवक पालिकेवर निवडून गेले होते. या निवडणुकीत चार सदस्यांचा एक वॉर्ड या पध्दतीने झाली होती. पण आता त्रिसदस्यीय वॉर्ड रचना आहे. आता विद्यमान 131 नगरसेवकांमध्ये 12 ची वाढ होणार असून, प्रभागांची संख्या देखील 47 वर जाणार आहे. सध्याची शहराची परिस्थिती पाहता, ठाणो महापालिकेत पुन्हा एकदा एक हाती सत्ता संपादीत करण्यासाठी शिवसेनेकडून रणनिती आखली जात आहे. राष्ट्रवादी मात्र गेल्यावेळी मिळवलेल्या जागा कायम ठेवून शिवसेनेकडून वाटाघाटीत मिळवलेल्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस मात्र आपल्या मतावर ठाम असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे आताही त्यांनी सांगितले आहे. "आम्हाला कोणाची गरज नसून, अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे, मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. शिवसेना आणि राष्ट्रवादीला साप आणि मुंगूस असा खेळ करत राहू द्या", असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. सेना आणि राष्ट्रवादी देखील त्यांना आपल्यात सामावून घेण्यास उत्सुक नाहीत, असेच चित्र आहे.
असा असू शकतो फॉर्म्युला...
ठाणो महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून माघार असणार आहे. तर राष्ट्रवादीचे जिथे वर्चस्व असेल त्या ठिकाणी शिवसेना त्यांना साथ देणार तर उर्वरीत ठिकाणी सामोपचाराने उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात काँग्रेस कुठेही नाही. मात्र जर एकत्र आलेच तर काही जागा त्यांना सोडू असेही सूत्रांनी सांगितले आहे.
आता पुढील आठवडयात या नरेश म्हस्के आणि आनंद परांजपे यांच्यात आघाडी बाबत पहिली बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु या दोघांमध्ये मागील काही महिन्यांमधील झालेल्या वादाची झालर पाहता हे दोघे आघाडीबाबत कशी चर्चा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागील काही दिवसात नरेश म्हस्के आणि परांजपे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्योरोपांच्या फैऱ्या झाडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे भांडणाची परंपरा ठाणोकरांना सर्वश्रृत आहे. त्यामुळे आतार्पयत जे भांडले ते आघाडी बाबत काय चर्चा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :