Thackeray Shivsena Dasara Melava: आवाज घुमणार शिवतीर्थावरच! शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी गर्जना, राज ठाकरे येणार का? उत्सुकता शिगेला पोहोचली
Thackeray Shivsena Dasara Melava: दादरमधील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दसरा मेळाव्याला परवानगी देताना 25 अटी प्रशासनाकडून घालण्यात आल्या आहेत.

Thackeray Shivsena Dasara Melava: शिवसेनेच्या स्थापनेपासून देदीप्यमान परंपरा असलेल्या शिवतीर्थावरच यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला शिवतीर्थावर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी दादरमधील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दसरा मेळाव्याला परवानगी देताना 25 अटी प्रशासनाकडून घालण्यात आल्या आहेत. यावेळी दसरा मेळावा अनेक अंगानी आकर्षण असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील कटूता कमी झाली असून तब्बल चार वेळा उभय बंधूंमध्ये गेल्या दोन महिन्यात भेट झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येऊन सामोरे जातील अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे.
आवाज घुमणार शिवतीर्थावरच!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2025
दसरा मेळावा २०२५ pic.twitter.com/HVfCuQILzI
दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावणार का?
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवरती तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाली होती. विविध अंगानी ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब बोललं जात आहे. दरम्यान, या बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब सुद्धा उपस्थित होते. मात्र, संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलं होतं. ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरु असल्याने दोन्ही बंधू एकत्र येऊन दसरा मेळाव्याला संबोधित केल्यास शिवसैनिकांसह मनसैनिकांसाठी सुद्धा पर्वणी असेल यात शंका नाही. दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मनोमिलन करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकत्र दिसू लागले आहेत.
युतीची घोषणा दसरा मेळाव्यातून?
दरम्यान, राज ठाकरे शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत शक्यता नाकारली असली, तरी काल झालेली प्रदीर्घ बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? किंवा युतीसाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र येत संयुक्त घोषणा करायची का? याचीही उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























