(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Weather : नागपूर गारठलं; पारा 9.9 अंशांवर; विदर्भातील जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय घट
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे उद्यापासून विदर्भात ढगांची दाटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरसह अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे.
Nagpur Weather News : विदर्भात (Vidarbha) अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरसह (Nagpur) सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. 48 तासांत नागपूरचा पारा तब्बल सुमारे 7 अंशांनी घसरून 9.9 अंशांवर आला असून यंदाच्या हिवाळ्यातील हे निचांकी तापमान ठरले. शनिवारी सकाळपासून तापमान कमीच होतं. गारठा आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे नागपूरकर आजही दिवसभर स्वेटर्स, जॅकेट्स व घालून फिरताना दिसून आले. सूर्यास्तानंतर थंडीची तीव्रता आणखीच वाढल्याचे जाणवले. थंड हवेचे ठिकाण असलेल्या पंचमढीत आज 9.2 अंशांची नोंद झाली. म्हणजेच नागपूर आणि पंचमढीचे तापमान जवळपास सारखेच होते. सध्या ढगाळ वातावरण असल्याने तापमान कमी झाले आहे. पण, आकाश निरभ्र झाल्यानंतर थंडीचा जोर अधिकच वाढेल, असा कयास लावला जात आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्याने शेकोट्या, जॉगिंग ट्रकला गर्दी पाहायला मिळत आहेत. तर अनेकजण थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करत आहेत
विदर्भाचा विचार केल्यास सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवले गेले. येथे नोंद झालेले तापमान विदर्भात सर्वात कमी तर राज्यात दुसरे नीचांकी ठरले. इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल तापमानातही सतत घसरण होत आहे. गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे तरुणांसह सारेच त्रस्त आहेत. थंडीपासून बचावासाठी ऊनी कपडे व शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही गारव्याचा त्रास होत आहे.
विदर्भातील जिल्हानिहाय तापमान
जिल्हा - तापमान
- गोंदिया - 8.8
- नागपूर - 9.9
- यवतमाळ - 10.5
- वर्धा - 11.0
- बुलढाणा - 11.0
- अकोला - 11.3
- ब्रम्हपुरी - 11.3
- अमरावती - 11.4
- वर्धा - 12.4
- चंद्रपूर - 12.0
- गडचिरोली - 12.4
- वाशीम - 13.2
वादळी पावसाची शक्यता!
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे उद्यापासून विदर्भात ढगांची दाटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरसह अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसू शकतो. पाऊस व ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
नाशिककरांना पुन्हा हुडहुडी!
नाशिकसह जिल्ह्यातील तापमानात काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आज अचानक या तापमानात चार अंशांची घट होऊन नाशिककरांना हुडहुडी भरली. कालपर्यंत थंडीचा पारा 14 अंशावर असताना आज थेट 10 अंशावर (Temperature) येऊन पोहचल्याने कमालीची थंडी जाणवली. शिवाय निफाड परिसरात 7.2अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने (cold) काढता पाय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
ही बातमी देखील वाचा