Onion : नाफेडतर्फे कांदा खरेदी म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण, स्वाभिमानीची सरकारवर जोरदार टीका
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावर स्वाभिमनी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) जोरदार टीका केलीय.
Swabhimani Shetkari Saghtana : सध्या राज्यात कांदा निर्यात शुल्काच्या मुद्यावरुन चांगलचं वाचावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी विरोध केलाय. वाढतो विरोध पाहता केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावर स्वाभिमनी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) जोरदार टीका केलीय. 2 हजार 410 रुपये भावाने नाफेडतर्फे केंद्र सरकारची कांदा खरेदी म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली.
... तेव्हा सरकार झोपले होते का?
शेतकरी जेव्हा कांदा तीन ते दहा रुपये किलो दराने विकत होता. तेव्हा सरकार झोपले होते का? असा सवालही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. दर कोसळळे होते तेव्हा केंद्राने या भावाने कांदा खरेदी करायला हवा होता असे संदीप जगताप म्हणाले. आज कांदा निर्यात शुल्क लावले नसते तर 40 ते 50 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री झाली असती. मात्र, केंद्र सरकार 24 रुपयांनी कांदा खरेदी करत आहे. म्हणजे मिळणाऱ्या बाजार भावाच्या अर्ध्याच किंमतीत ही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचीच सरकारची नीती असल्याची जगताप म्हणाले.
पन्नास रुपये किलो दरानं कांदा खरेदी करावा
नाफेडमार्फत सरकारला कांदा खरेदी करायचाच असेल तर त्यांनी तो पन्नास रुपये किलो दरानं खरेदी करावा. तेव्हाच शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडेल अशी मागणी संदीप जगताप यांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर वाढायला लागले की सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचे संदीप जगताप म्हणाले.
केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
दरम्यान काल (22 ऑगस्ट) राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर सरकारनं महाराष्ट्रात दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच धनंजय मुंडे यांनी कांद्याच्या निर्यात शुल्क निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, नाफेडमार्फत कालपासूनच कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली आहे. गरज पडल्यास अधिकची कांदा खरेदी करणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: