Surekha Punekar on Lal Mahal Lawani: शुद्धीकरण करण्यासाठी लावणी एवढी घाण आहे का? सुरेखा पुणेकर भडकल्या
Surekha Punekar on Lal Mahal Lawani: लावणी केल्यानंतर लाल महालाचंं शुद्धीकरण केलं.लावणी एवढी घाण आहे का?, असा संतप्त सवाल लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी उपस्थित केला आहे.
Surekha Punekar on Lal Mahal Lawani: मराठा सेवा संघाने लाल महालाचं शुद्धीकरण केलं, अभिषेक केला. लावणी हे लोकनृत्य आहे. महाराष्ट्राची शान आहे. लाल महालाचं शुद्धीकरण करण्याएवढी लावणी घाण आहे का? असा सवाल लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केलाय.
आजची पीढी रिल करण्यासाठी कुठेही जातात. तशीच वैष्णवी लाल महालात गेली. तिने रिल शुट केलं. लावणी शुट करणं चांगलंच आहे. मात्र लाल महालात केलं ही बाब चुकीची आहे. त्या व्यतिरिक्त तिने दुसरीकजे शुट करायला हवं होतं. शुट केलं पण तिने अंगप्रदर्शन केलं नाही. वैष्णवीने रिल केलं आता ती वादात सापडली. तिने जागेचं भान ठेवायला हवं होतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
लावणी बघायला सगळ्यांनाच आवडते. मात्र त्यावरुन कोणीही राजकारण करु नये. लाल महालाचं शुद्धीकरण करणं म्हणजे लावणीचा अपमान आहे. राष्ट्रवादी आणि मराठा सेवा संघाने जी भूमिका घेतली त्याला माझा विरोध आहे. कशाचंही राजकारण करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. त्यामुळे यावरुन नवीन वाद किंवा राजकारण करु नये, असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलंय.
लावणी अशी कुठेही केली जात नाही.त्यासाठी भरपूर व्यासपीठ आहेत. लावणीला वेगळा मान आहे. महाराष्ट्राची लावणी देशभर प्रसिद्ध आहे. त्याला उत्तम इतिहास आहे. त्यामुळे एक लावणी सम्राज्ञी म्हणून मी या राजकारणाचा विरोध करते, असंही त्या म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
पुण्याची ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालात अभिनेत्री वैष्णवी पाटील आणि तिच्या तीन सहकाऱ्यांनी रिलचं शुटींग केलं. या रिलवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आणि आंदोलनही केलं. त्यानंतर तिच्यासह चौघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लावणीला जितेंद्र आव्हाडचा ट्विट करत विरोध
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोध दर्शवला."पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका", असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.