Suraj Chavan Inquiry: सूरज चव्हाण यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू
युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. जम्बो कोव्हिड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सूरज चव्हाण हे मुंबई पोलिसांच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या चौकशी सुरू झालेली आहे . कोविड घोटाळा प्रकरणात ईडी करून चौकशी झाल्यानंतर आता मुंबईची SIT टीम सुद्धा सूरज चव्हाण याची चौकशी करत आहे. कॅगच्या अहवालावर मुंबई पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर SIT स्थापन करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या देखरेखीखाली SIT काम करत आहे. कॅगने मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या खर्चात झालेली कथित अनियमितता अधोरेखित केली होती . पालिकेच्या नऊ विभागांनी केलेल्या एकूण 12000 कोटींच्या खर्चात अनियमितता असल्याचा कॅगचा अहवाल होता. रस्ते तसेच माहिती तंत्रज्ञान आणि ब्रीज विभागाने केलेल्या खर्चाची चौकशी सुरू केली.
युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. जम्बो कोव्हिड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मनी लॉड्रिंग चा तपास करणाऱ्या ED ने सुजित पाटकर आणि दहिसर जंबो कोव्हिड सेंटरचे डीन किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. ED ने केलेल्या तपासात समोर आलेल्या माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्त केली. त्याच माहितीच्या आधारे सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू आहे.
ईडीकडून चौकशी सुरू
कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले होते. दरम्यान या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच व्हॉट्सअॅप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे. या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं देखील नाव समोर येत आलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून करण्यात येत आहे.