BJP MLA Jaykumar Gore News : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) बुधवारी नामंजूर केला. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे गोरेंची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सत्र न्यायालयात शरण जाऊत रितसर जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र कुठेच दिलासा न मिळाल्यानं जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -
मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार दिली आहे.
या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आपण कोणतीही फसवणूक केलेली नसल्याचा दावा गोरेंच्यावतीनं कोर्टापुढे करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या