BJP MLA Jaykumar Gore : भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा मंजूर केला आहे. हायकोर्टाचं नियमित कामकाज सुरू होईपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले. 9 जूनपर्यंत जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं सातारा पोलिसांना दिले आहेत.
वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेंच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.
काय आहे प्रकरण
मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार दिली आहे.
या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आपण कोणतीही फसवणूक केलेली नसल्याचा दावा गोरेंच्यावतीनं कोर्टापुढे करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: