Aurangbad News: औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमने मंगळवारी शहरात भव्य असा मोर्चा काढला होता. त्यांनतर यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. नामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत अशी टीका संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच इम्तियाज जलील यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथ टेकण्यासाठी कसे काय वेळ मिळतो, असेही शिंदे म्हणाले. 


एमआयएमच्या मोर्च्यावर प्रतिक्रिया देतांना संतोष शिंदे म्हणाले की, इम्तियाज जलील यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथ टेकण्यासाठी कसे काय वेळ मिळतो. म्हणजे यांच्या डोक्यात आजही रजाकारांचे विचार भरलेले दिसतात. संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला देण्यात आले आहे, त्यामुळे विनाकारण विरोध करून त्या नावाचा अवमान करू नका. औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीराजे यांचे नाव देणे अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पोटसुळ उठायचं काय कारण असे संतोष शिंदे म्हणाले.


ही तर तमाम शिवप्रेमीची इच्छा


नामांतरावरून जलील यांच्या पोटात दुखायला लागले आहे. आपल्या वडिलांचे नाव बदलल्यासारखं त्यांना दुखः होत आहे. ज्या औरंगजेबाने आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत युध्द केले आणि ज्याने संभाजीराजे यांची हालहाल करून हत्या केल्याचा इतिहास आहे. हाच इतिहास जर पुसण्याचं काम मावळे करत असतील तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे. जलील यांना यांना लोकांनी मतदान करून निवडून दिले आहे. जनाची नाही मनाची लाज बाळगा. त्यामुळे संभाजीनगरला विरोध करू नका हा फक्त आमचा इशारा नाही तर तमाम शिवप्रेमीची इच्छा असल्याच शिंदे म्हणाले.


शिवसेनेकडूनही टीका...


जलील यांनी नामांतराच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा फक्त मुस्लिम मतदारांना एकजूट ठेवण्यासाठी एमआयएमकडून प्रयत्न करण्यात येत आहे. जशी वाळू पायाखालून सरकते तशी मुस्लिम मते सरकत असल्याने जलील यांच्याकडून अशी आंदोलने केली जात आहे. त्यामुळे ज्यांची दहा-बारा वार्डात तुटपुंजी ताकत आहे, त्यांनी आम्हाला ललकारल्यास त्याला ललकारण्याची ताकत शिवसेनेत असल्याच उत्तर दानवे यांनी दिले आहे.