कोल्हापुरात उसाला 3500 रुपयांचा दर मिळतो मग सोलापुरातच 2800 का? शेतकरी आक्रमक, 8 तारखेपासून आमरण उपोषण
सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 2800 ते 2850 जाहीर केला आहे. यावरुन शेतकरी आक्रमक झालेत. उसाला 3500 रुपयांचा दर देण्याची मागणी केली जात आहे.
Solapur News : ऊस दराच्या मुद्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. साखर कारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 2800 ते 2850 जाहीर केला आहे. मात्र, शेजारील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दर हा 3500 ते 3600 रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जर 3 हजार 500 रुपयांचा दर देणं शक्य असेल तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानादरांना तेवढा दर देणं का शक्य नाही? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. कारखानदारांनी जर 3500 रुपये दर जाहीर केला नाहीतर 8 डिसेंबरपासून शेतकरी नेते समाधान फाटेसह इतर शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 3500 रुपये जाहीर करावा
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी देखील उसाचा पहिला हप्ता 3500 रुपये जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कारखानदारांनी जर उसाला 3500 रुपयांचा दर जाहीर केला नाहीतर 8 डिसेंबरपासून पंढरपुरातील वाखरी पालखीतळ आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन देखील पंढरपुरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.

ऊस दर ठरवताना कारखानदारांची एकी
ऊस दरासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी साथ देण्याचे आवाहन शेतकरी संगटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. 8 तारखेपासून वाखरी पालखीतळ येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. शेजारील जिल्ह्यांमधे 3200 ते 3500 पहिला हफ्ता मिळत असताना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र 2800 ते 2850 पहिला हफ्ता जाहिर केला आहे. या कारखानदारांचा उघडपणे कितीही एकमेकाला विरोध असला तरी ऊस दर ठरवताना मात्र यांची एकी पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघायला मिळाली आहे. याच कारखानदारांच्या विरोधात आता शेतकरी संघटनांनी गांधीगिरी मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शेतकऱ्यांनी पक्ष पार्टी गट तट न बघता या आंदोलनामधे सामिल व्हावं, शेतकरी नेत्यांचं आवाहन
या निमित्ताने 2017 मधे झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती करायची असेल 3500 हजार रुपये पहिला हफ्ता घ्यायचा आसेल तर शेतकऱ्यांनी देखील पक्ष पार्टी गट तट न बघता या आंदोलनामधे सामिल होण्याचे आवाहन शेतकरी चळवळीतील नेते निवास नागणे यांनी केले आहे. या ऊस दरासाठीच्या उपोषणाच्या निमित्ताने गावभेट दौरे करुन शेतकऱ्यांमधून जनजागृती देखील करण्यात येणार असल्याची माहिती समाधान फाटे, निवास नागणे, निरंजन ताटे, विनोद बागल, दत्तात्रय बिल्डर या शेतकऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात उसाला अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचं पिकं म्हणजे ऊस आहे. ऊस शेतीवर या भागातील हजारो प्रपंच उभे आहेत. मात्र, या वर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसलाय. एका बाजूला शेतकरी आस्मानी संकटात आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदारांनी दर जाहीर न केल्यामुळं सुलतानी संकटात आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोणत्या कारखानदाराने किती दर दिला?
पांडुरंग सहकारी साखर कारखाना - 2855
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील - 2850
श्री शंकर सहकारी साखर कारखाना - 2900
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर - 2850
विठ्ठल सहकारी साखर कारखाना - 2875
भैरवनाथ शुगर्स आलेगाव - 2800 (100 आणि 101 असे दोन हप्ते नंतर देणार)
महत्वाच्या बातम्या:
























