(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढील दहा तारखेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवणार, कारखानदारांचा निर्णय
यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि रिकव्हरी साडेनऊ टक्क्याने करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस बंद आंदोलन पुकारले आहे.
कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलेले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज साखर कारखानदारांची दुसरी बैठक कोल्हापूरमध्ये पार पडली. या बैठकीत पुढील दहा तारखेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतलेला आहे.
यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि रिकव्हरी साडेनऊ टक्क्याने करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात ज्या साखर कारखान्यांवर ट्रक आणि ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस घेऊन जात आहेत त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे .
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील साखर कारखानदारांनी कारखाना बंद ठेवण्यास आवाहन केलं होतं. यासंदर्भात गेल्याच आठवड्यात कारखानदारांची एक बैठक झाली होती. याचा दुसरा टप्पा आज कोल्हापूरमध्ये पार पडला . आज कारखानदारांनी बोलावलेल्या बैठकीत पुढील दहा तारखेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या प्रकरणात शेतकऱ्यांना हा दर देणे कारखानदारांना सध्या शक्य नाही, एफआरपी प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर कारखाने सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आलेला आहे.