(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’, वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा
वृक्षलागवडीसारख्या ईश्वरी कार्यावर शंका घेणारे तुम्ही कोण? ज्यांनी झाडाचं कलम सोडाच साधं एक पान देखील लावलं नाही, त्यांनी शंका कशासाठी घ्यावी, असा थेट सवालं मुनगंटीवारांनी सरकारला केला आहे.
मुंबई : वृक्षलागवडीवर आमची चौकशी लावत आहात पण तुमच्या चौकशा लागल्या तर घाबरु नका अस वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. वृक्षलागवडीसारख्या ईश्वरी कार्यावर शंका घेणारे तुम्ही कोण? ज्यांनी झाडाचं कलम सोडाच साधं एक पान देखील लावलं नाही, त्यांनी शंका कशासाठी घ्यावी, असा थेट सवाल मुनगंटीवारांनी सरकारला केला आहे. त्यांना फक्त आम्ही केलेला विकास खुपतो असही ते म्हणाले. 'आता फक्त माझी अपेक्षा एवढीचं की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’ असा थेट इशारा मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला दिला आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. तर भाजप सरकारच्या काळातील वृक्षलागवडीची चौकशी करुन दाखवा, असंही मुनगंटीवार म्हणालेत.
वृक्षलागवडीलसारख्या ईश्वरी कार्याच्या चौकशीच्यामार्गे काहीतरी करायला जायचं आणि टपली मारुन जायचं असा विचार करु नका. याद राखा, खबरदार तुम्ही आम्हाला इतरांसारखं समजाल तर ‘ये तो आग से खेल हैं’ असा धमकी वजा इशाराही सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
‘तुम्ही स्वत: ईडीची चौकशी लागली तर रडायचं काम करत, आमच्यासाठी हे राजकारण असल्याचं म्हणायचं, पण आम्ही रडणारे नाही. जर तुम्ही चौकशी करत असाल तर वन सचिवांकडून नाही तर उच्च न्यालयाच्या न्यायाधीशांकडून करा. आता मीही पाहतो सरकारमध्ये किती दम आहे , असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.
Special Report | किती झाडं लावली? किती जगली? मुनगंटीवरांच्या वृक्ष लागवड योजनेची चौकशी | ABP Majhaभाजपचे 10 आमदार तरी फोडून दाखवा, सुधीर मुनगंटीवारांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान
माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उरस्थित होते. सत्तांतरानंतर भाजपात गेलेले नेते अस्वस्थ असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरातांनी जोरदार टोला हाणला. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फक्त बोलू नका, तर भाजपचे 10 आमदार तरी फोडून दाखवा असं थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिलं आहे.
दरम्यान सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.