नवी मुंबई : कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी मनेष बच्छाव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संजय पाटील यांच्या वागणूकीवर आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण जीवाचे बरेवाईट करू शकतो, असा पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.


"अनेक वेळा आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, परिष्ठ अधिकारी संजय पाटील यांनी खोडा घालून आपले मानसिक संतूलन बिघडवलेले आहे. त्यामुळे मला जीवन जगण्यात रस नसल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. याबरोबरच  आपण पारदर्शक काम करत आहे. परंतु, माझी बदनामी करून बदली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्ष मनेश बच्छाव हे शनिवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनेष बच्छाव यांचा पत्ता नसल्याने मिसींग तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठांना विचारले असता कोणीही बोलण्यास तयार नाही. 


नवी मुंबई पोलीस खात्यात बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून यामागे खान्देश मधील काही अधिकारी वर्ग सक्रीय असल्याचे पोलीस खात्यात बोलले जात आहे. त्यामुळे बदली करताना आपल्याच भागातील व्यक्ती सिनियर पोस्टवर कसा जाईल याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे इतर भागातील अधिकारी वर्गात असंतोष पसरला आहे. दरम्यान, याबाबत आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्याकडून काहीच पावले उचलली जात नसल्याने या प्रकाराला त्यांची मूक संमती आहे का? असा प्रश्न पोलीस कर्मचारी खासगीत विचारत आहेत.


दरम्यान, उपनिरीक्षक गायब झाल्याचे प्रकरण घडले असताना दुसरीकडे गुन्हे शाखेत महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिलांबाबतीत अपमानास्पद शब्द वापरले जात असून त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वारंवार चुकीचे शब्द वापरले जात असल्याने महिला अधिकाऱ्याने वरिष्ठांविरोधात तक्रार केली आहे. 


महत्वाच्या बातम्या