सोलापूरनंतर आता मुंबई जवळील मिरा रोडमध्ये देखील एक ऑनलाईन फसवणुकीची घटना समोर आली आहे. येथील एका तरुणीला ऑनलाईन लोन घेणं चांगलंच महागात पडलं आहे. या तरुणीने ऑनलाईन 7 हजारांचे लोन घेतले होते. मात्र लोन घेतल्यानंतर तिला सात दिवसातच 7 हजारच्या लोनसाठी 20 हजार रुपये परत करण्यासाठी धमकीचे फोन येऊ लागले आहेत. इतकंच काय तर, आरोपींनी या तरुणीच्या मोबाईलमधील सर्व डेटा चोरून तिच्या संपर्कातील लोकांना अश्लील मेसेज केले आहेत. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.             


ऑनलाईन जाहिरात पाहून घेतलं कर्ज  


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही 22 वर्षाची असून ती मीरा रोडमध्ये राहते. तिने आपल्या मैत्रिणीकडून उसणे पैसे घेतेले होते. हेच पैसे तिच्या मैत्रिणीने तिला परत मागितले. पैसे परत करण्यासाठी या तरुणीने ऑनलाईन लोन घेण्याचा विचार करा. पीडित तरुणीने इनस्टाग्रावर एक ऑनलाईन जाहिरात बघितली होती. या जाहिरातीत दोन अॅपलिकेशन (Mobile App) डाउनलोड केलं तर तुम्हाला बिना व्याजाने तात्काळ कर्ज मिळू शकतं, असं लिहिलं होत. यात कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याची मुदत ही दिली होती. यानुसार, तरुणीने “सन कॅश” आणि “कॅश एडवान्स” हे दोन अॅपलिकेशन डाउनलोड केले. यानंतर लगेच तरुणीच्या बँक खात्यात दोन कंपनीने 3, 657 रुपये प्रत्येकी असे 7 हजार रुपये पाठवले. 



तरुणीला लोन घेतल्यानंतर काही मिनिटातच सात हजाराच्या बदल्यात सात दिवसात वीस हजार भरण्याचा मेसेज तिला आला. त्यावर तरुणीने काही रिप्लाय दिला नाही. त्यानंतर तिला अनेक धमकीचे मेसेज येवू लागले. यानंतर हे आरोपी तिच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील मेसेज पाठवू लागले. लोन घेण्यासाठी या तरुणीने ऑनलाईन पॅनकार्ड आधारकार्ड दिलं होतं. त्याच बरोबर मोबाईल अॅक्सेस ही दिल्याने सर्व संपर्कही त्या आरोपींकडे गेले होते. शेवटी कंटाळून तरुणीने काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात आयटी कायदा आणि भारतीय दंड कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 


सांगलीतही घडला होता असाच प्रकार 


सोलापूरमध्ये एका महिलेने आपल्या मोबाईलमध्ये अनसिक्युअर अ‍ॅप डाऊनलोड केले होते. यानंतर काही दिवसांनी महिलेला सतत धमकावणारे मेसेज येत होते. यात आरोपी महिलेला 'तुम्ही आमच्याकडून 8 लाखांचे लोन घेतले असून तात्काळ पैसे परत करा अन्यथा तुमची बदनामी करु', अशी धमकी देत होते. इतकेच नाही तर महिलेने डाउनलोड केलेल्या अ‍ॅपमुळे तिच्या मोबाईलमधील खासगी डेटा देखील या आरोपींनी चोराला. पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी खालील बातमीच्या लिंकवर क्लिक करा.


संबंधित बातमी: सावधान...! स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभव