वसई : वसईत हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करुन फरार झालेला तिच्या प्रियकरानेही बिहारमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. वसई पश्चिमेच्या स्टेट्स या हॅाटेलमध्ये 28 फेब्रुवारी 2022 रोजी एका 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. ही तरुणी तिचा सागर नाईकसोबत त्या हॉटेलमध्ये आदल्या दिवसापासून राहत होती. सागर सायंकाळीच निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुममधून काहीच हालचाल नसल्याने हॉटेल मालकाने पोलिसांना बोलावून रुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर तरुणीची हत्या झाल्याच कळलं. वसई पोलिसांनी सागरवर हत्येचा गुन्हा दाखल करुन, शोध सुरु केला होता. मात्र पोलिसांना सागर सापडत नव्हता. 


बिहारच्या मुझ्झफरनगर इथल्या एका हॉटेलमध्ये सागरने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. बिहार पोलिसांनी रात्री वसई पोलिसांना कळवल्यानंतर सागरचे कुटुंब सागरचा मृतदेह वसईला आणण्यासाठी आज (7 मार्च) सकाळी बिहारला गेले आहेत. सागरने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे का? सागरने तरुणीची हत्या का केली याबाबत काही पुरावे सापडतात का हे शोधण्यासाठी माणिकपूर पोलीसही बिहारला रवाना झाले आहेत. 


वसईतील स्टेट्स या हॅाटेलमध्ये सायली शहासने ही 26 वर्षीय तरुणी तिचा मित्र सागर नाईकसोबत 27 फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास आली होती.  त्याने मद्यपान केले आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता तो हॉटेलमधून निघून गेला. पण 28 फेब्रुवारीला सकाळपासून त्या रुममधून काहीच हालचाल न झाल्याने हॅाटेल मालकाने पोलिसांना बोलावून स्वतःजवळच्या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी सायली रक्ताच्या थारोळ्यात बेडवर दिसली. मुलीच्या डोक्यावर अज्ञात वस्तूने प्रहार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दोघेही तरुण-तरुणी वसईच्या एव्हरशाईन इथले रहिवासी आहे. या दोघांचही लग्न ठरलं असल्याची माहिती आहे. घटनेनंतर सागर नाईक फरार झाला होता. त्याला अटक केल्यानंतरच या हत्येचा उलगडा झाला असता, परंतु आता त्यानेही आत्महत्य केल्याने तरुणीची हत्या नेमकी का केली हे गूढ कायम आहे. जर सागने सुसाईड नोट लिहिली असेल आणि त्यात तरुणीची हत्या तसंच स्वत: आत्महत्या का करत आहे, याचं कारण नमूद केलं तरच या प्रकरणावर पदडा उठेल.