(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown In Ratnagiri : रत्नागिरीत 2 जूनपासून पुढील आठ दिवस कडक निर्बंध, दूधही घरपोच मागवावं लागणार
रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोविड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही
रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने 2 जून पासून सकाळी 7 वाजेपासून ते 8 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मेडिकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान/आस्थापना पुर्णतः बंद राहतील. दुध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत पुरवता येईल.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करण्यास किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास बंद करण्यात येत आहेत. तथापि, केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैद्यकिय उपचारासाठी व कोविड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या 1 आणीबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोविड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही
मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि, अशी मालवाहतुक केवळ दुकानापर्यंत/आस्थापनेपर्यंत माल वितरण करणेपुरती मर्यादित राहील. कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरवता येणार नाही. याबाबत नियामांचं उल्लंघन केलेलं आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोविड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करणेत येईल. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात सुरु ठेवणेस मुभा राहील.