(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jejuri Shashan Aplya Dari : तयारी अंतिम टप्प्यात असताना जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम रद्द; खर्चाला जबाबदार कोण?
जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्या (12) जुलैला जेजुरीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Jejuri Shashan Aplya Dari : जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्या (13) जुलैला जेजुरीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर राहणार होते. मंत्रिमंडळ विस्तारामुळे कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा सुरु आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. पावसाचे दिवस असल्याने परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला होता. प्रत्येक तहसीलमधील नागरिकांना या संदर्भातील माहिती देण्यात आली होती. सगळी तयारी अंतिम टप्प्यात असताना अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर आतापर्यंत झालेल्या खर्चाला जबाबदार कोण?, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येणार होते. त्यात पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जेजुरीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. बदलत्या राज्याच्या समीकरणानंतर हा कार्यक्रम फार महत्वाचा होता. त्यात जेजुरीत म्हणजेच पवारांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुढील पाच ते सात दिवसांत हा कार्यक्रम घेतला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. मात्र तारीख अजून जाहीर केलेली नाही आहे.