कोल्हापूर : गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलं आहे. अशातच कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली असून कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


अनिल मारुती कांबळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील मडीलगे गावचे रहिवासी आहेत. ते 2015 साली एसटीच्या सेवेत रुजू झाले आहेत. सध्या ते सावंतवाडी आगार चालक म्हणून काम करत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने ते त्यांच्या मूळ गावी आले होते. गेल्या दोन दिवसात राज्य शासनाने कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 


दोन तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.


एसटी विभागाचे स्पष्टीकरण
कारवाईच्या भीतीने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना एसटी विभागाने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अनिल मारुती कांबळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आपल्या राहत्या गावी गारगोटी येथे दुःखद निधन झाले आहे. सरदारची घटना सावंतवाडी आगाराचे स्थानक प्रमुख श्री विशाल शेवाळे यांनी फोन द्वारे कळवली आहे. सदर चालकाचे एसटी महामंडळाने निलंबन वैगेरे केलं नाही. काही लोक संबंधित मृत्यू एसटीच्या संपाशी जोडत आहेत. संपाशी आणि या मृत्यूचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण एसटीकडून करण्यात आलं आहे.


एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करुन संप मागे घेण्यावर विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.  


एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना लागतोय. 


संबंधित बातम्या :