यवतमाळ: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर अशोक पाल या MBBS च्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बुधवारी रात्री 8.30 वाजता मेडिकल परिसरातिल रस्त्यावर हत्या झाली होती. त्याच हत्येचा उलगडा आता यवतमाळ पोलिसांनी केला आहे. एका शुल्लक कारणावरून डॉक्टरची हत्या झाल्याची बाब पुढे आली आहे.
यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या डॉक्टर अशोक पाल यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. दुचाकीवरून येणाऱ्यांचा धक्का लागल्याने डॉ. अशोक आणि त्या दुचाकीवरील तिघांचा शाब्दीक वाद झाला आणि त्यानंतर दुचाकी वरील एका आरोपीने डॉ. अशोक ला धारधार चाकूने छातीत आणि पोटात वार करून डॉ. अशोक पाल यांची हत्या केल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी आरोपींनी तशी पोलिसांना कबुली दिली असून आतापर्यंत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
बुधवारी रात्री 8.30 सुमारास एमबीबीएसला शिकणारे डॉक्टर अशोक पाल हे ग्रंथालयातून त्यांच्या हॉस्टेलकडे पायी परत जात असताना दुसर्या दिशेने वेगाने मेडिकल परिसरात दुचाकीने तिघे जण निघाले होते. त्याच वेळी मेडिकल कॉलेजच्या एका वळणावर त्या दुचाकीस्वारांचा डॉ. अशोक यांना धक्का लागला आणि त्यांनी तात्काळ त्याबद्दल दुचाकीस्वारांना विचारणा केली आणि त्यावरून तिथे शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातून झालेल्या वादातून दुचाकीवरील एकाने डॉक्टरला धारदार शस्त्राने भोसकले त्याच वेळेस डॉक्टर अशोक पाल तिथेच रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला .
त्यानंतर त्या घटनास्थळा वरून जाणाऱ्या दोघांना डॉ. अशोक रस्त्यावर पडून दिसले. त्यांनी तात्काळ मेडिकल मधून अॅंबुलन्स बोलावून डॉ. अशोक यांना रूग्णालयात दाखल केले. तोपर्यंत डॉक्टर अशोक यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर शिकाऊ डॉक्टरांनी आंदोलन उभं करीत या हत्येस जबाबदार व्यक्तीला तात्काळ अटक करा अशी मागणी केली. डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मेडिकल ची आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यातील मेडिकल क्षेत्रात डॉ. अशोक पाल यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. आणि मेडिकल फील्ड मध्ये या हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर मेडिकल कॉलेजच्या गेटवर शिकाऊ डॉक्टर यांनी मेडिकलचे तीन प्रवेशद्वार बंद करुन आंदोलन सुरू केले होते. आता या हत्येच्या घटनेचा उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सुरवातीला 30 ऑगस्ट 2021 रोजी मेडिकल परिसरात मुलींच्या होस्टेल समोर दोन व्यक्तीनी लघुशंका केली होती. त्यावेळी झालेल्या वाद पोलिसात गेला होता. त्यानंतर ते प्रकरणं समझोता होवून सामोपचाराने ते प्रकरण मिटले होते. मात्र डॉ अशोक यांच्या हत्या त्या कारणातून झाली होती काय? यावर पोलिसांनी सुरवातीला तपास सुरू केला होता. मात्र कुठेही सुगावा लागत नव्हता.
डॉ. अशोक यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी सहा पथक तयार करण्यात आली होती. प्रत्येक टीम बारकाईने तपास करीत होती पारंपरिक आणि तांत्रिक बाबी च्या साहाय्याने पोलिसांनी तपास चक्रे फिरविली यासाठी पोलिसांनी 100 च्या जवळ खबरीचे नेटवर्क नेमण्यात आले. पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकसह सायबर सेल आणि यवतमाळ शहर पोलीस यांनी मिळून तपास केला. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहचले. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डॉ. अशोक यांच्या हत्येची कबुली दिली.
खरं तर एक होतकरू आणि गरीब कुटुंबातील डॉ. अशोक पाल यांची शुल्लक कारणावरून हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . आता या मेडिकल परिसरामध्ये राहणाऱ्या डॉक्टर यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. शिवाय मेडिकल परिसरातिल संपूर्ण भागात cctv कैमरे कार्यान्वित करण्याची गरज आहे. तसेच या भागातील प्रकाश व्यवस्था दुरुस्ती करून आजूबाजूच्या परिसरात वाढलेली झाडेझुडपे स्वच्छ करावी आणि येथून कुठल्याही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये आणि होस्टेल कडे जाताना येथे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर यांना हा परिणाम सुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या :