Marie Curie Felloship : युरोपियन कमिशन गेल्या पंचवीस वर्षपासून जगप्रसिद्ध आणि दोन वेळेला नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. मेरी क्युरी (Marie Curie Felloship) यांच्या नावाने जगातील सर्वोत्कृष्ट तरुण संशोधकांना संशोधनपर फेलोशिप देते. ही फेलोशिप मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांना 2018  (1,50,000 युरो, 1.25 कोटी रुपये) आणि 2020 (2,25,000 युरो, 2 कोटी रुपये) अशी मिळाली आहे. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत. या वर्षी युरोपियन कमिशन मेरी क्युरी फेलोशिपला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काही जागतिक तरुण शास्त्रज्ञांचा सन्मान करणार आहे. संपूर्ण जगात गेल्या 25 वर्षात एक लाखापेक्षा अधिक शास्त्रज्ञांना ही मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे. 


या वर्षी या जगभरातील एक लाख शास्त्रज्ञांमधून काही निवडक तरुण मेरी क्युरी शास्त्रज्ञांनि केलेल्या संशोधनाची  आणि त्यांच्या संशोधन प्रकल्पाची माहिती युरोपियन कमिशनच्या "HORIZON" या ऑफिशिअल मॅगझिन मध्ये प्रसिद्ध केली आहे. या मॅगझिनमध्ये डॉ. थोरात यांनी केलेल्या संशोधनाची आणि त्यांचा कार्याची दाखल घेतली आहे, जगभरातील पाच शास्त्रज्ञांचा यामध्ये समावेश असून या पाच शास्त्रज्ञांमध्ये डॉ. थोरात हे एकमेव आणि पहिलेच भारतीय आहेत. 10 नोव्हेंबर रोजी हे मॅगझिन प्रसिद्ध झाले असून त्याबाबतची माहिती युरोपियन कमिशनच्या सायन्स आणि इनोव्हेशन कमिशनर मारिया गॅब्रियल यांनी ऑफिसिअल वेबसाईट आणि ऑफिसिअल ट्विटर तसेच फेसबुक अकॉउंट वरून दिली आहे. 


काय आहे डॉ. थोरात यांचे संशोधन?
डॉ. थोरात आणि त्यांचे सहकारी यांनी 2016 ते 2020 या वर्षांमध्ये युरोपियन कमिशनच्या अर्थसाहाय्याने 'नॅनोकार्गो' हा संशोधन प्रकल्प राबवला होता. यामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी + आयुर्वेद (आयुर्वेद) + लेसर अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकत्रित करून दोन्ही आजारवरच एकच प्रभावी उपचारपद्धती शोधण्याचे कार्य केले. डॉ. थोरात यांच्या संशोधन गटाने ' चुंबकीय गुणधर्म असणारे गोल्ड नॅनो पार्टिकल्स आणि त्यावर अँटिकॅन्सर (कॅन्सर विरोधी) आणि अँटीबॅक्टरीयल (बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा) गुणधर्म असणारा आयुर्वेदिक पदार्थ कुरक्युमिन (हळद) यांचे संयुग तय्यार केले. हे नॅनो संयुग चुंबकीय ऊर्जा आणि लेसर किरणांच्या साहाय्याने सक्रिय करून कॅन्सर ट्युमर आणि प्रतिजैविकला विरोध करणारे करणारे बॅक्टेरिया या दोन्हींना 30 मिनिटनापेक्षा कमी वेळेत 100 टक्के निष्क्रिय करते. 


या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकीय ऊर्जा तसेच लेसर किरण वापरून हे नॅनो संयुग शरीरामध्ये ज्या ठिकाणी कॅन्सर ट्युमर आहे अशा ठिकाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय लक्षित करता येतेय. तसेच हे नॅनो संयुग वापरून एमआरआय आणि सिटी स्कॅन या कॅन्सरचे निदान करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करता येतेय की ज्यामुळे कॅन्सरचे निदान लवकरात लवकर करता येऊन रुग्णांचा पुढचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करता येतोय. हे संशोधन तंत्रज्ञान फक्त प्रयोगशाळेत न राहता लवकरात लवकर मानवी उपचारपद्धतीत हस्तांतरित करण्यासाठी 2020 मध्ये युरोपियन कमिशनने याला इन्व्हेंशनचा पण दर्जा दिला आहे. त्यामुळे यावर आधारित कंपनी स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच जानेवारी 2021 मध्ये युरोपियन कमिशनने 2020 मध्ये मानवी जीवन सुखकर करणाऱ्या आणि  संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रातील भविष्यातील जग बदलावणारे 10 सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प "Brightside of 2020" (2020 ची उज्ज्वल बाजू) या शीर्षकाखाली जाहीर केले होते. या सर्वोत्कृष्ट 10 मध्ये, सर्वश्रेष्ठ पहिल्या क्रमांकाचा संशोधन प्रकल्पाचा मान, ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्ह्णून कार्यरत असणारे डॉ. नानासाहेब थोरात यांच्या प्रकल्पास जाहीर झाला होता. हा बहुमान मिळवणारे डॉ. थोरात हे पहिलेच आणि एकमेव भारतीय आहेत.


याचबरोबर डॉ. थोरात यांनी केलेल्या संशोधनाची माहिती तरुण विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्यामधून नवीन भविष्यातील संशोधक घडावेत म्हणून युरोपियन कमिशनने  "Science is Wonderfull" या वैज्ञानिक मिशनसाठी डॉ. थोरात यांची निवड केली आहे. या मिशन अंतर्गत यूरोपमधील 28 देशांतील 500 पेक्षा अधिक शाळा आणि कॉलेजस मध्ये 50,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसमोर 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान व्यख्यान देण्याची संधी डॉ. थोरात याना मिळाली आहे. 


डॉ. थोरात यांचे  2012 पासून 90 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर, 5 आंतरराष्ट्रीय पुस्तके, 3 आंतरराष्ट्रीय पेटंट/इंव्हेशन्स आणि 20 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुस्तकामध्ये पुस्तक अध्याय प्रसिद्ध झाले आहेत. याबरोबरच डॉ. थोरात हे युरोपियन कमिशनच्या Cooperation in  Science and Technology (COST ) या सायंटिफिक मिशनचे व्यवस्थापन समितीचे 2018 ते 2022 या वर्षांसाठीचे आयर्लंड सरकारने अधिकृत केलेले एकमेव भारतीय सदस्य आहेत. तसेच डॉ. थोरात याना रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री इंग्लंड, अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इन्स्टिटयूट ऑफ फिजिक्स इंग्लंड यासारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मानद सदस्यपद दिले आहे.


महत्वाच्या बातम्या :