पंढरपूर : कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षाने भरत असलेल्या कार्तिकी यात्रेला एसटी संपाचा मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. यात्रेसाठी कर्जे काढून लाखो रुपयाचा माल भरलेले व्यापारी मात्र यामुळे धास्तावले आहेत. कोरोना संकटानंतर होत असलेली ही पहिली यात्रा म्हणून कुंकू बुक्का, प्रासादिक साहित्य, वारकरी वाद्ये, तुलशीमाळा अशा अनेक व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा माल कार्तिकी यात्रेसाठी भरून ठेवला होता. आज कार्तिक शुद्ध नवमीला देखील मंदिर परिसरात अतिशय तुरळक गर्दी असल्याने एसटी संपामुळे वारकर्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आज दिसत आहे. 


गेले दोन वर्षे बंद असलेले कुंकू कारखाने या वर्षी सुरु झाले होते. हजारो रुपयांचे कुंकू, बुक्का बनवून ठेवण्यात आला होता. चुरमुरे, बत्तासे, पेढे अशा प्रासादिक व्यापाऱ्यांनी देखील लाखो रुपये कर्जे घेऊन कार्तिकीला दुकाने सजविली होती. वारकरी वाद्यांची या यात्रेत मोठी खरेदी होत असल्याने मृदूंग, पखवाज, टाळ, ढोलकी, वीणा, तंबोरे, तबला, पेटी अशा वारकरी वाद्यांच्या दुकानातही शुकशुकाट दिसू लागल्याने हे व्यापारी देखील अडचणीत येणार आहेत. सध्या देवाचे फोटो, पितळी आणि फायबरच्या मुर्त्यांच्या दुकानात थोडेफार भाविक दिसत असून मंदिर परिसरातील बाकी बाजारपेठा थंड असल्याने व्यापारी अडचणीत येणार असल्याचं चित्र आहे.


कोरोनाचे नियम आणि अटींचं पालन करून 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दोन वर्षानंतर होत असलेल्या यात्रेसाठी एवढी तयारी करूनही वारकऱ्यांची संख्या रोडवल्याने आता या मालाचे पैसे कसे भरायचे हि चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे. कार्तिकी यात्रा काळात गोपाळपूर पर्यंत जाणारी दर्शन रांग अजूनही चंद्रभागेच्या शेजारील सारडा भवनच्या पुढेही न गेल्याने हि यात्रा एसटी संपामुळे फेल जाणार असल्याचे व्यापारी बोलू लागले आहेत. 


सध्या एसटी संपामुळे खाजगी वाहनाने आणि पायी वारी करणारे भाविक यात्रेसाठी दाखल झाल्याने शहरात कोठेच गर्दी दिसत नाही. एसटीचा संप लगेच मिटल्यास शेवटच्या दोन दिवसात हजारोंच्या संख्येने भाविक येऊ शकणार असून 2019 साली एसटी महामंडळाच्या बसेस मधून तब्बल अडीच लाख भाविक पोचले होते.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha