Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; सातारा सत्र न्यायालयाचा निर्णय
ST Strike : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना आता मुंबईला आणण्यात येणार आहे.
मुंबई: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या अटकेत होते. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
सातारा पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. ती नामंजूर करुन सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आता मुंबईला आणण्यात येणार असून ऑर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.
दरम्यान, डॉ. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. अॅड. जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्या अद्याप न्यायालयासमोर आल्या नाहीत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात आणले जात असताना त्या वेळेला त्यांनी चक्क खा. उदयनराजे यांची कॉलर उडवण्याची स्टाईल मारत न्यायालयात प्रवेश केला. गुणरत्न सदावर्ते यांची ही स्टाईल पाहून अनेकजण अवाक झाले.
काय आहे प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऑक्टोबर 2020मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे, मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या: