ST Strike : संप मिटणार की राहणार? उद्या सकाळी संपकऱ्यांची भूमिका स्पष्ट करणार: सदाभाऊ खोत
ST Strike : राज्य सरकारने आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर आता संपकऱ्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आज चर्चा करणार आणि उद्या यावर भूमिका स्पष्ट करणार असं आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य सरकारच्या या प्रस्तावावर आता संपकरी चर्चा करणार असून यावर उद्या सकाळी निर्णय घेण्यात येईल असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीला आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर उपस्थित होते. त्यानंतर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.
...तर संपातून बाहेर पडतो: गोपीचंद पडळकर
राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये आ. गोपीचंद पडळकर आणि आ. सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यानंतर अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केल्याची घोषणा केली त्यावेळीही हे दोघे उपस्थित होते. त्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाल्याचं दिसून येतंय. यामध्ये आम्ही जर राजकारण करतोय असं वाटत असेल तर संपातून बाहेर पडतो असा इशारा आ. गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
- ST Workers New Salary : 3 ते 5 हजार रुपये वाढीसह अन्य भत्ते, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ?
- ST Strike : एसटी संप मिटणार? कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय, अनिल परबांची घोषणा
- ST Strike : एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha