![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार रखडला, अर्थ खात्याकडून कोंडी होत असल्याचा आरोप
MSRTC: एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार रखडला असून अर्थ विभागाकडून थकीत असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
![ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार रखडला, अर्थ खात्याकडून कोंडी होत असल्याचा आरोप ST Employees Salary January salary of ST employees pending MSRTC is facing economic problems ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार रखडला, अर्थ खात्याकडून कोंडी होत असल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/76e7e2a1fff3773b66ab018591e7a13c167636971517793_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी (ST Employees Salary) राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या महामंडळाची अर्थ विभागाकडून कोंडी होताना दिसते आहे. अर्थविभागाकडून आतापर्यंत सरकारनं दिलेल्या निधीचे विवरण सादर करण्याचे एसटी महामंडळाला सांगितले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यातील पगार रखडला असून आणखी काही काळ तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडे असलेले परिवहन खातं आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अर्थ खात्यामध्ये बेबनाव असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकीत असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी 360 कोटी रुपये मिळाले हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्यानं महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकीत रक्कम मागितली होती.
मात्र अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात 16 फेब्रुवारी रोजी अर्थ, परिवहन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारनं कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. अशात आता पगाराचे भविष्यच विवरणावर अवलंबून असल्यानं कर्मचारी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ST Employees Salary: एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारवर टीका
एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतुद केली जाईल आणि महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात संप काळात मान्य केले होते. जानेवारी महिन्यात 19 तारखेला एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी 1018.50 कोटी रुपयांची मागणी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती पण त्याला आता एक महिना होत आला तरीही सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. आता अजून काही दिवस वेतन लांबेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते आहे. या दोन खात्यातील बेबनावामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)