एक्स्प्लोर
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी एक वर्षांवर
मुंबई : राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या कनिष्ठ वेतनश्रेणीतील 12 हजार 514 कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. शिवाय कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला आहे.
विधान परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. 1 एप्रिल 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, ही कर्मचाऱ्यांची मागणी होती. मात्र ती रद्द न करता तिचा कालावधी एक वर्ष एवढा करण्यात आला आहे.
कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर वेतनात 500 रुपयांनी वाढ करण्यात येईल. एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल, असं दिवाकर रावते यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
कनिष्ठ वेतनश्रेणी 2000 साली लागू करण्यात आली. सेवेत रुजू झाल्यानंतर 5 वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करण्याची त्यावेळी तरतूद करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ होतो.
मात्र 2012 पासून कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षे एवढा करण्यात आला. या वेतनश्रेणीत सध्या एकूण 25 सेवाअंतर्गत 12 हजार 514 कर्मचारी कार्यरत आहेत.
एसटी महामंडळाने विविध मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांसोबत कनिष्ठ वेतनश्रेणी कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर वेतनश्रेणीचा कालावधी एक वर्ष एवढा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सेवेत रुजू होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतरही तुटपुंज्या वेतनात काम करावं लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement