एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : आक्षेपार्ह पोस्टने शहर पेटलं आणि दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली
धर्म या एका शब्दासाठी हा राडा झाला. पण हिंदू धर्मप्रेमींनी ना वसंत रुपनरांच्या कुटुंबाची वास्तपुस्त केली. ना मुस्लिमांचा ठेका घेतलेले मोहसीनच्या कुटुंबासाठी धावून आले.

सोलापूर/पंढरपूर : चार वर्षांपूर्वी कोणी एका माथेफिरुने सोशल मीडियाचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली आणि यानंतर राज्यात सुरु झालेल्या दंगलीचा फटका अनेक निरपराध कुटुंबाला बसला. एका कुटुंबातील कमावता माणूस कायमचा अपंग होऊन बसला तर एका कुटुंबाने आपला तरणाबांड मुलगा गमावला. वसंत रुपनर कोण हे आठवणं तुम्हाला शक्य नाही. कारण आपली विस्मरणाची शक्ती अफाट असते. 31 मे 2014 ला शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा बदनामीकारक मजकूर फेसबुकवर दिसला. भावना तीव्र झाल्या. दंगल पेटली. त्यावेळी मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करणारे वसंत रुपनर सांगोला तालुक्यातील खरातवाडी या मूळ गावी चालले होते. एसटीत होते. बाहेरुन भिरकावलेला दगड एसटीच्या खिडकीतून डोक्यावर बसला आणि सगळं संपलं. वसंत रुपनर अपंग झाले आहेत. यानंतर रुग्णालयातच वसंत रुपनर यांना शुद्ध आली. शरीर अंथरुणाला खिळलेलं. काहीही होणं अशक्य. वसंतरावांना गावी आणण्यात आलं. आमदार, खासदार, मंत्र्यांची रीघ लागली. आर्थिक मदतीचं आश्वासन मिळालं. मात्र आज चार वर्षानंतर ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्यांना जगायचं नाही. पत्नी सखुबाई यांचा तर आता कोणावरच विश्वास उरलेला नाही. दोन मुलं आणि नवऱ्याची जबाबदारी सावरत त्यांना मुलांनाही शिकवायचं आहे. एक मुलगा मूकबधीर असल्याने त्याची काळजी तर मोठा आता अकरावीत गेला. पण त्याच्या शिक्षणखर्च कसा भागवायचा या चिंतेने त्या मोडून चालली आहे. वसंत रुपनरांवर हल्ला झाला तेव्हा राहुल सातवीत होता. आता राहुल अकरावीत आहे, सायन्स शाखेचं शिक्षण घेत आहे. पण तेही भगवान भरोसे. लिहायला वह्या नाहीत म्हणून एकाच वहीत सगळे लिहून घेतो आणि पुस्तकांसाठी मित्र बनवून त्यांच्या पुस्तकावर अभ्यास करत आहे. ही झाली वसंतरावांची गोष्ट आता याच दंगलीत आणखी एकाचा जीव गेला होता. त्याचं नाव होतं मोहसीन शेख. पुण्याच्या आयटी कंपनीत काम करायचा. ज्या दिवशी दंगल झाली तेव्हा तो हडपसरच्या मशिदीतून नमाज पडून घरी निघाला होता. तेवढ्यात अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला. तो जखमी झाला. रुग्णालयात नेलं तेव्हा मोहसीनचा जीव गेला होता. यानंतर पुणे पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह 21 जणांना अटक केली. आतापर्यंत त्यातल्या 16 जणांना जामीन मिळाला आहे. मोहसीनचे वडील सादिक यांच्या आग्रहामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम खटला लढवत होते. पण त्यांनी तो अचानक सोडला. यामुळे सादिक आणि त्यांची पत्नी प्रचंड धक्क्यात होते. केंद्र सरकारने मोहसीनच्या कुटुंबाला तीन लाखाच्या मदतीचं आश्वासन दिलं होतं. मोदींच्या गुड गव्हर्नन्सच्या राज्यातही आजवर त्याला मंजुरी मिळाली नाही. राज्याने तर छदामही दिला नाही. मोहसीनच्या भावाला नोकरीचं आश्वासनही होतं. ते कधीच हवेत विरलं. घरातला कमावता मुलगा गेल्याने हे कुटुंब अडचणीत आलं आहे. मोहसीनचे वडील सादिक शेख आजही सरकारकडे डोळे लावून बसले आहेत. फेसबुकवरची एक आक्षेपार्ह पोस्ट शहर पेटवून गेली. दोन कुटुंबं कायमची उद्ध्वस्त करुन गेली. धर्म या एका शब्दासाठी हा राडा झाला. पण हिंदू धर्मप्रेमींनी ना वसंत रुपनरांच्या कुटुंबाची वास्तपुस्त केली. ना मुस्लिमांचा ठेका घेतलेले मोहसीनच्या कुटुंबासाठी धावून आले. जे सत्य आहे ते तुमच्यासमोर आहे. यातून काय धडा घ्यायचा तो तुम्हीच घ्या.
आणखी वाचा























