एक्स्प्लोर
कमी पैशात हजयात्रेचं आमिष, 25 यात्रेकरुंची साडेसात लाखांना फसवणूक
कशिश टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्स'च्या नावाखाली आरोपींनी कमी पैशात हज यात्रेचं आमिष दाखवलं. 25 यात्रेकरुंकडून आरोपींनी सात लाख 58 हजार रुपये उकळले.

सोलापूर : इस्लाममध्ये पवित्र समजली जाणारी हज यात्रा कमी पैशात करुन देण्याच्या आमिषाने सोलापुरात 25 यात्रेकरुंची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुजात अली शेख आणि शाहवेज शेख अशा आरोपी बापलेकांना अटक करण्यात आली आहे. 'कशिश टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्स'च्या नावाखाली आरोपींनी कमी पैशात हज यात्रेचं आमिष दाखवलं. या आमिषाला भुलून 25 जणांनी नावनोंदणी केली. आरोपींनी यात्रेकरुंकडून सात लाख 58 हजार रुपये उकळले. यात्रेला पाठवण्याचा कोणताही पुरावा नसताना या दोघांनी बनावट तिकीट तयार करुन व्हॉटसअपद्वारे पाठवलं. याबाबत मुफ्ती मोहसीन मुन्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर इतर 24 जणांचीही अशाचप्रकारे फसवणूक झाल्याचं समोर आलं. सोलापुरातील जेलरोड पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघां आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी जेलरोड पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी केलं आहे.
आणखी वाचा























