Bhima Sugar Factory Election : भीमा साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, 15 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Bhima Co-operative Sugar Factory Election) आज मतदान होत आहे.
Bhima Co-operative Sugar Factory Election : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Bhima Co-operative Sugar Factory Election) आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे. संचालक पदाच्या 15 जागांसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत विजयासाठी दोन्ही गटात चुरस लागली असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांच्या कुटुंबियांनी पुळूज येथे मतदानाचा हक्क बजावला.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यात खरा सामना होत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळ्याचं प्रकारचे राजकारण पाहायला मिळालं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी धनंजय महाडिक यांनी पाठिंबा देत, त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. तसेच राजन पाटील यांच्यावर कडाडून टीका केल्याचे देखील पाहायला मिळालं. दुसरीकडं भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राजना पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर युवा उद्योगपती असणारे साखर कारखानदारीत मोठं नाव असलेले अभिजीत पाटील यांनी धनंजय महाडिकांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाडीक विजयाची हट्रिक करणार की....
पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले आहे. 15 जागांसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सत्ताधारी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यामध्येही लढत होत आहे. भाजप खासदार धनंजय महाडीक यांच्या ताब्यात गेले 10 वर्षांपासून कारखान्याची सत्ता असून, महाडिक विजयाची हट्रिक करणार की राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि भाजपचे परिचारक यांचे पॅनल सत्ता परिवर्तन घडवणार याचे भवितव्य आज ठरणार आहे.
एकूण 56 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथील मतदान केंद्रावर आज सकाळी कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, त्यांचा मुलगा विश्वराज, कृष्णराज, आई शकुंतला आणि पत्नी अरुंधती यांनी पुळूज येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
महत्त्वाच्या बातम्या: