Solapur News Update : मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात ; सहा जण जागीच ठार
Solapur News Update : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर गावाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली
Solapur News Update : मोहोळ-पंढरपूर महामार्गावर दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात चौघे जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजानक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नीचा तसेच त्यांच्या नातेवाईकांचा आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय.
डॉ. आफरिन मुजाहिद अत्तार, डॉ. मुजाहिद अत्तार, मुलगा अरमान अत्तार, डॉ. आफरीन यांचे बंधू इरफान खान, त्यांच्या पत्नी बेनझीर इरफान खान, मुलगी अनाया इरफान खान या सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर स्कॉर्पिओ गाडी मधील राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे मंदाकिनी शेटे हे सर्व जखमी झाल्याची माहिती आहे.
अत्तार आणि खान कुटुंबातील सदस्य आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. आज मोहोळला परतत असताना पेनूर जवळच्या माळी पाटी जवळ पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची त्यांच्या कारला जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की खान यांच्या कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झालाय. अपघात पाहून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचे प्रयत्न केले. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना सोलापुरात उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. तर मृतांना मोहोळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस घटना स्थळी पोहोचले. अपघातग्रस्त मृतदेह उत्तरीय प्रक्रियेसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने व वाहतुकीला अडथळा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मोहोळ पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पोलिसांची तत्परता?
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले. त्यानंतर महामार्गावरील वाहने वाजूला करून वाहतून सुरळीत केली. घटनास्थली बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.