(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खोटी कागदपत्रे देऊन उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्याचा घाट; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांवर निशाणा
Ujani Dam Water Issue : खोटी कागदपत्रे देऊन उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्याचा घाट असल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांवर करण्यात आला आहे. हा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणी प्रश्न आता आणखी पेटणार असल्याची चिन्हं आहेत. उजनीचे पाणी लाकडी लिम्बोडी योजनेसाठी नेण्याच्या हालचाली पवार कुटुंबाकडून सुरु असून खोटी कागदपत्रे तयार करून हे पाणी काटेवाडीला नेले जाणार असल्याचा गंभीर आरोप उजनी संघर्ष समितीचे संजय पाटील घाटणेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. घाटणेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.
उजनी संघर्ष समितीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. संजय पाटील घाटणेकर यांनी कागदपत्रांसह गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की, उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्यासाठी काटेवाडी दुष्काळी असल्याचा बारामती तहसीलदार यांचा दाखल जोडल्याचे सांगितले आहे. काटेवाडीला गेल्या ७५ वर्षांपासून बारमाही पाणी मिळत असताना अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून खोटी कागदपत्रे जोडल्याचा गंभीर आरोप देखील घाटणेकर यांनी केला आहे . ही योजना जुनी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न होत असला तरी या योजनेवर 31 जानेवारी 2022 ची तारीख असल्याचे घाटणेकर यांनी दाखवून दिले.
सोलापूर जिल्ह्यातील उजनीवरील अनेक योजनांना 1 रुपयाही दिला जात नसताना या योजनेला 346 कोटी रुपये कसे मंजूर झाले असा सवाल त्यांनी केला. हा सर्व घाट उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्यासाठी अजित पवार यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही योजना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली असून अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन सोलापूर जिल्ह्यात केले जाईल असा इशारा संजय पाटील घाटणेकर यांनी दिला.
पत्रकार परिषदेत माऊली हळणवर यांच्यासह उजनी संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी घाटणेकर यांनी सर्व पुराव्यांची कागदपत्रे सादर केली. संजय पाटील घाटणेकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असून त्यांना पक्षाने करमाळा येथील उमेदवारी देण्यात आली होती. नंतर पक्षाने त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून अपक्ष उमेदवार आणि सध्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे याना पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी संजय पाटील घाटणेकर हे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते.