सोलापूर मनपा आयुक्त पी शिवशंकर यांना कोरोनाची लागण
आयुक्त पी शिवशंकर यांच्या जागी अप्पर आयुक्त म्हणून आजच रुजू झालेले विजय खोराटे यांच्याकडे आयुक्तांचा कारभार सोपवण्यात आला आहे. पी शिवशंकर आपलं काम थांबवणार नसून होम क्वॉरंटाईन होऊन घरूनच कामकाज पाहणार आहेत.
सोलापूर : सोलापूरचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची कोरोना चाचणी पॉसिटिव्ह आली आहे. त्यामुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. 28 जून रोजी मनपा आयुक्तांचे अहवाल पॉसिटिव्ह आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. याआधी सोलापुरातील लोकप्रतिनिधी देखील कोरोना पॉसिटिव्ह आढळले होते. किंबहुना शहराच्या प्रथम नागरिक महापौर श्रीकांचना यन्नम ह्या देखील कोरोना पॉसिटिव्ह होत्या.
मात्र शहरातली कोरोना परिस्थिती हाताळता हाताळता आयुक्तांचाच रिपोर्ट पॉसिटिव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. फिल्डवर जाऊन काम करत असतानाच कोणाच्या तरी संपर्कात आल्याने आयुक्तांना लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाचणी पॉसिटिव्ह आली तरी ते आपलं प्रशासकीय कामकाज थांबवणार नाहीयेत. होम क्वॉरंटाईन होऊन घरूनच कामकाज पाहणार आहेत. त्यांच्या जागी अप्पर आयुक्त म्हणून आजच रुजू झालेले विजय खोराटे यांच्याकडे आयुक्तांचा कारभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान आयुक्तांशी दररोज संपर्कात आल्याने विशेष खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे देखील वर्क फ्रॉम होम करणार आहेत. सोलापुरातील कोरोनाबधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यात कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारीच पॉसिटिव्ह आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सोलापूरकरांच्या पाठीशी असल्याचं मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं.
सोलापूरमधील कोरोनाची सद्यस्थिती
सोलापुरात आज 79 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सोलापूर शहरमधील 48 आणि सोलापूर ग्रामीणमधील 31 रुग्णांचा समावेश आहे. सोलापुरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2609 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1353 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
#Coronavirus | भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, लांडगे फडणवीसांच्या संपर्कात