Barshi Scam : 'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद! 'विशाल' घोटाळ्यानंतर बार्शीतल्या व्हायरल पाटीची चर्चा
Solapur Barshi Froud Case :फटे स्कॅमनंतर सोशल मीडियात अनेकजण पोस्ट करत असून यावर जोक्सचा महापूर आलाय. सोबतच गोरगरीब लोकांचा पैसा देखील यात असल्यानं त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे
![Barshi Scam : 'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद! 'विशाल' घोटाळ्यानंतर बार्शीतल्या व्हायरल पाटीची चर्चा Solapur Barshi Froud Case Board goes viral after Vishal Phate scam Latest update Barshi Scam : 'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद! 'विशाल' घोटाळ्यानंतर बार्शीतल्या व्हायरल पाटीची चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/76a4d0dd33e564d99a07bb15d3171a10_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Solapur Barshi Froud Case : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन सोशल मीडियावर जोक्स आणि काही पाट्या देखील व्हायरल होऊ लागल्या आहेत. 'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद! अशी पाटी एका दुकानदारानं लावली आहे. ही पाटी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतेय.
फटे स्कॅमनंतर सोशल मीडियात अनेकजण पोस्ट करत असून यावर जोक्सचा महापूर आलाय. सोबतच गोरगरीब लोकांचा पैसा देखील यात असल्यानं त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे तर काळा पैसा असणाऱ्यांची मात्र नाव न घेता टर उडवली जात आहे.
काल विशाल फटेच्या वडिलांसह भावाला अटक
बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात पहिली अटक झाली आहे. मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे. अंबादास फटे, भाऊ वैभव फटे या दोघांना बार्शी न्यायालयानं पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस
मागील आठवड्याभर केवळ चर्चा सुरु असलेल्या बार्शीतल्या स्कॅमप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला होता. आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे यानेच शेवटी या प्रकरणात फिर्याद दिली . विशालने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांना देखील विशाल फटेने कोट्यवधींची फसवणूक केली आहे. दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर मात्र एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)