नाशिक/सोलापूर : राज्यात गेल्या 24 तासांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 13 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट पलटून झालेल्या अपघातामध्ये सहा जण बेपत्ता झाले आहेत. गेल्या 20 तासांपासून त्यांचा शोध घेऊनही अजूनही कोणीच हाताशी न लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा बुडून मृत्यू झाला. इगतपुरीमध्ये मायलेकींचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला. चिमुकल्या लेकीला वाचवण्याच्या नादात आईचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये भावली धरणामध्ये मामा आणि चार भाच्यांचा एकापाठोपाठ बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर धरणाच्या पाण्यात डुबकी मारण्याचा निर्णय जीवावर बेतला. त्यामुळे गेल्या 24 तासांमध्ये तीन घटनांमध्ये 13 जणांचा बळी गेला आहे. 


उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील 


दरम्यान, उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कुगाव व झरे या गावातील आहेत. त्यामुळे परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे. झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), हे अजून सापडलेले नाहीत. काल रात्रीपासून कुगाव व झरे गावातील गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत. एनडीआरएफ टीमकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मात्र, अद्याप एकाच देखील शोध लागलेला नाही. करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव सुद्धा बुडाला आहे. 


शॉर्ट कट जीवावर बेतला 


उजनी धरणाच्या जलाशयात राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक सहा जणांच्या जीवावर बेतली आहे. करमाळा तालुका आणि इंदापूर तालुका यांच्यामध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे. करमाळ्यातून इंदापूरकडे रोडमार्गे प्रवास करण्यासाठी 100 किमीचा वळसा मारावा लागतो. यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र, बोटीतून केवळ 5 ते 7 किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलीकडे इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्ट कट जीवावर बेतला आहे. या बोटींवर ना लाईफ जॅकेट असतात, ना बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्याची उपकरणे असतात. 


मामा-भाच्यांसह एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू 


दरम्यान, इगतपुरीमधील भावली धरणात (Bhavali Dam) बुडून मामा-भाचे अशा एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. हनिफ शेख (24) भाचा अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14 सर्व रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) यांच्यासोबत पर्यटनासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर गेले होते. पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर धरण्याच्या पाण्यात डुबकी मारण्याचा धाडसी निर्णय या तरुणांनी घेतला आणि तोच त्यांच्या जीवावर बेतला. पाण्यात सुरवातीला दोन जण बुडत होते, त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी उडी मारली आणि एका पाठोपाठ 5 जणांचा मृत्यू झाला.  


इगतुपरीत मायलेकींचा बुडून मृत्यू 


भावली धरणात पाच जणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच विहिरीत बुडून माय लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील मुंढे गावजवळील शेनवड खुर्द गावामध्ये ही घटना घडली. 23 वर्षीय महिला प्रियंका दराणे शेतात काम करत होती. 3 वर्षीय मुलगी विहिरी जवळ गेल्यानंतर पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी महिलंनं उडी मारल्याने तिचाही मृत्यू झाला. विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. 


इतर महत्वाच्या बातम्या