रायगड : महायुतीमधील रायगड मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष थांबत नसल्याचं चित्र आहे. मंत्री भरत गोगावले यांनी राज्यात महायुती परंतु रायगडमध्ये अपवाद असेल, असं म्हटलं. दुसरीकडे सुनील तटकरेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांची वक्तव्य थांबवावीत, असं आमदार महेंद्र दळवी म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सुरु झालेला संघर्ष दोन्ही पक्षांमध्ये कायम असून त्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
रायगड जिल्ह्यात सुरू झालेला पालकमंत्री पदाचा वाद शिवसेना आणि राष्ट्रवादीत एकीकडे टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेच्या रायगड मधील तिन्ही आमदारांनी राष्ट्रवादीला कदापि सोबत घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तिन्ही आमदारांची आता राज्याचे उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केली का असा प्रश्न निर्माण होतोय.याचे कारण म्हणजे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी राज्यात आम्ही महायुती म्हणून लढणार परंतु रायगड मध्ये अपवाद असेल असं म्हटलं. रायगडचा अपवाद सोडला तर राज्यात इतरत्र युतीतून लढणार असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकेल अस सुद्धा मंत्री भरत गोगावले म्हणाले.
सुनील तटकरेंना महेंद्र दळवींचा सल्ला
सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे काही प्रवक्ते ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत ती थांबवण्याचा सल्ला आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये आमचा आम्हाला विचार करावा लागेल, असं दळवी यांनी म्हटलं. रायगड जिल्ह्यात 7 आमदार पैकी तीन आमदार हे सेनेचे आहेत तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, असं असताना राष्ट्रवादीने जे काही वातावरण निर्माण करू पाहते त्यावर त्यांनी उचित विचार करावा, असं महेंद्र दळवी म्हणाले.
राष्ट्रवादीनं योग्य विचार न केल्यास आगामी काळातील निवडणुकांमध्ये आमची आम्हाला व्यूहरचना करावी लागेल, असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. भरत गोगावले यांनी जे विधान केलं आहे ते आमच्या पक्षाची लाइन असते. मात्र, राष्ट्रवादीचे जे काही प्रवक्ते असे वक्तव्य करत आहेत ती थांबणं गरजेचं आहे, असा सल्ला महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे . त्यामुळे आरोप प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष कधी थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून सुरु आहे. रायगडचं पालकमंत्रिपद हा वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. दोन्ही बाजूनं कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याचं चित्र आहे.