US Strikes on Iran: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावात (Israel-Iran conflict) आता अमेरिकाही (US) सामील झाला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथे हा हल्ला करण्यात आला असून तो पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ही माहिती देत या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. बहुतेक बॉम्ब फोर्डो नावाच्या जागेवर टाकण्यात आले होते." त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक ही केले आणि म्हणाले, "आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही." यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, आता शांततेचा काळ आहे. किंबहुना, या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या दोन देशातील तणावात आता अमेरिकेनेही उडी घेतल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे.
अमेरिकेची इस्रायलला मदत?
जेव्हा अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला तेव्हा त्यांनी स्वतःला थेट इराणशी युद्धात ओढले. हे पाऊल इराणचा अणुकार्यक्रम संपवू इच्छिणाऱ्या इस्रायलला मदत करणारे म्हणून पाहिले जाते. मात्र हा निर्णय विशेष आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात असे वचन दिले होते की ते पुन्हा अमेरिकेला मध्य पूर्वेतील युद्धात ओढणार नाहीत.
हल्ल्याच्या फक्त 48 तास आधी ट्रम्प यांनी सांगितलं होते की..
हल्ल्याच्या फक्त 48 तास आधी ट्रम्प म्हणाले होते की, इराण आणि इस्रायलमध्ये राजनैतिक तोडगा निघतो का हे पाहण्यासाठी अमेरिका दोन आठवडे वाट पाहेल. ते म्हणाले होते, "जर चर्चेची शक्यता असेल तर मी दोन आठवड्यात निर्णय घेईन की पुढे काय करायचे." पण आता ट्रम्प यांनी थेट हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये गुप्त चर्चा सुरू होती. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवरील हल्ला काही काळासाठी पुढे ढकलण्यास सांगितले होते, जेणेकरून शांततापूर्ण तोडगा काढता येईल. परंतु आता असे दिसते की चर्चेचा मार्ग बंद झाला आहे आणि थेट लष्करी मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
हे ही वाचा
