Ujani Dam Backwater Boat Accident : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे देखील बुडाला आहे. 35 फूट खोल पाण्यात बोट सापडली असली, तरी प्रवाशी मात्र सापडलेले नाहीत. त्यामुळे दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेली बोट 17 तासानंतर सापडली आहे. मात्र सहा प्रवासी बेपत्ता असल्याने एनडीआरएफकडून शोध सुरु आहे.
बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर
दरम्यान, या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.
बुडालेली बोट सापडली, प्रवाशांचा शोध सुरुच
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना वादळी वाऱ्याने बोटीचा अपघात झाला. या घटनेत सहा ते सात प्रवासी बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. बुडालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरुच आहेत.
खासदार रणजित नाईक निंबाळकर काय म्हणाले?
दरम्यान, बोट दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर दुर्घटनास्थळी पोहोचले. रणजित निंबाळकर NDRF टीम सोबत जलाशयात उतरले होते. खासदार निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुडालेल्या प्रवाशांचे साहित्य मिळाले आहे. त्यांनी सांगितले की, बोट खडकात अडकली असून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नदीचं पात्र मोठं असल्याने एनडीआरएफ तपास करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या