Sindhudurg Nagarpanchayat Election : कुडाळमध्ये नारायण राणेंना तर देवगडमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg Nagarpanchayat Election) चार पैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.
सिंधुदुर्ग : तळकोकणात चार नगरपंचायत या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. गेल्या निवडणुकीत एक उमेदवार असलेल्या देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपनेही आठ जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे देवगड नगरपंचायतीवर त्यांची सत्ता येईल.
कुडाळ नगरपंचायतीमध्येही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच अवघ्या एका जागेने घोळ घातला आहे. कुडाळ नगरपंचायतमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस यांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीच्या ताब्यात जाऊ शकते. कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसने मदतीचा हात पुढे केल्यास याठिकाणीही भाजपची सत्ता येऊ शकते किंवा आघाडीची सत्ता येणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली. त्यामुळे आता कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालया समोरून वैभव नाईक यांची विजयी मिरवणूक जात असताना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
वाभवे वैभवववाडी नगरपंचायतची सत्ता भाजपने राखली आहे. आमदार नितेश राणेंनी याठिकाणी आपली सत्ता राखली आहे. वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजपला नऊ, शिवसेना पाच आणि अपक्ष उमेदवारांनी तीन जागांवर विजय मिळवला. वैभववाडीत भाजपचे नेते जयेंद्र रावराणे वैभववाडी पोलीस स्थानकात झाले. जयेंद्र रावराणे यांचा मुलगा रोहन रावराणे हा अपक्ष म्हणून निवडून आला. भाजपच्या रॅली सोबत त्याची ही विजयी मिरवणूक शहरातून काढली जात होती. त्यावेळी पोलिसांनी वाहनात केलेला विजयी रथ(टेम्पो)व साउंड सिस्टीमचा एक टेम्पो ताब्यात घेतला त्यामुळे वैभववाडी पोलीस स्थानकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. दीपक केसरकरांच्या ताब्यात असलेली कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता शिवसेना भाजप युतीकडे होती. मात्र आताच्या निवडणुकीत भाजपने 12, शिवसेना दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि अपक्ष दोन उमेदवार विजयी झाले. त्यामुळे दीपक केसारकरांना धक्का देत भाजपने कसई दोडामार्ग नगरपंचायत खेचून आणली.
जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आपलं वर्चस्व असल्याचा दावा करत आहेत. चारही नगरपंचायत आपल्याकडे असतील असा दावा भाजप कडून करण्यात येत आहे. तर शिवसेनेकडून आपल्या ताब्यात दोन नगर पंचायत असल्याचा दावा करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत मधील पक्षीय बलाबल
जिल्ह्यातील चार नगरपंचायत एकूण जागा 68
- शिवसेना - 22
- भाजप - 37
- कॉंग्रेस - 2
- राष्ट्रवादी - 2
- अपक्ष - 5
कुडाळ नगरपंचायत
- शिवसेना - 7
- भाजप - 8
- काँग्रेस- 2
- राष्ट्रवादी - ०
- अपक्ष - ०
- इतर - ०
देवगड जामसंडे नगरपंचायत
- शिवसेना - 8
- भाजप - 8
- काँग्रेस- ०
- राष्ट्रवादी - 1
- अपक्ष - ०
- इतर - ०
कसई दोडामार्ग नगरपंचायत
- शिवसेना - 2
- भाजप - 12
- काँग्रेस - ०
- राष्ट्रवादी - 1
- अपक्ष - 2
- इतर - ०
वाभवे वैभववाडी नगरपंचायत
- शिवसेना - 5
- भाजप - 9
- काँग्रेस - ०
- राष्ट्रवादी - ०
- अपक्ष - 3
- इतर - ०
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pune Nagar Panchayat Election Result 2022 : देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता; भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे पराभूत
- NagarPanchayat Elections Result : बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का
- Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha