सिंधुदुर्ग : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक राज्यात सहकार क्षेत्रातील सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक झाली. या लक्षवेधी निवडणुकीतील निकाल जाहीर होवून भाजपने बाजी मारत सत्तेची चावी आपल्याकडे घेतली. त्यामुळे आता जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबत आमदार नीतेश राणेंच्या जवळचे मानले जाणारे मनीष दळवी त्यांनाही संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पूर्वानुभव पाहता धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 22 मतदारांनी उमेदवारांना नाकारत नापसंत मतदान केले. निकालामध्ये अनेक धक्कादायक निर्णय आले. भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागांवर यश आले. त्यामुळे जिल्हा बँकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. या निकालात महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सतीश सावंत व भाजपचे पॅनेल प्रमुख राजन तेली या दोघांचाही पराभव झाला. तब्बल 10 विद्यमान संचालक पराभूत झाले तर 15 नवीन चेहरे निवडून आले आहेत.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आता भाजपची सत्ता आल्याने गेली साडेसहा वर्षे जिल्हा बँकेत अध्यक्ष असलेले सतीश सावंत यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. आता नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आहे आणि याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपची सत्ता आल्याने साहजिकच नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण असणार याचा निर्णय केंद्रीय मंत्री राणे घेणार आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या 11 सदस्यांमध्ये अतुल काळसेकर हे दुसऱ्यांदा निवडून आलेले संचालक आहेत. अन्य 10 चेहरे नवीन आहेत. त्यामुळे काळसेकर यांच्या बाजूने अध्यक्ष पदासाठी पारडे झुकत आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडीवेळी धक्कातंत्राचा वापर करण्याची सवय आहे. नेहमीच्या पध्दती प्रमाणे धक्कातंत्राचा वावर केल्यास सतीश सावंत यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या विठ्ठल देसाई यांना अध्यक्ष पदाची लॉटरी लागू शकते. कारण विठ्ठल देसाई हे 1990 पासून राणेंचे निष्ठावंत आहेत. तसेच राणेंपासून फारकत घेत शिवसेनेत गेलेल्या सतीश सावतांचा पराभव केल्याने विठ्ठल देसाईंना अध्यक्ष पदाची लॉटरी लागू शकते.


मात्र कणकवली मधील संतोष परब हल्ला प्रकरणी ज्यांचं नाव समोर येत ते मनीष दळवी यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्याने ते मतदान सुद्धा करू शकले नव्हते. तरीही त्यांनी विलास गावडे यांच्यासारख्या सक्षम विद्यमान संचालकाचा पराभव केला. तसेच मनीष दळवी हे आमदार नीतेश राणेंच्या जवळचे असल्याने त्यांनाही संधी मिळू शकते. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धक्कातंत्र वापरलं तर विठ्ठल देसाई यांनी संधी मिळू शकते.


महत्त्वाच्या बातम्या :