नवी दिल्ली : जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. भारतातही शुक्रवारी एकाच दिवसात 16 हजार 764 रुग्णांची भर पडली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या 70 दिवसांतील सर्वाधिक संख्या असून त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांनी खबरदारीच्या उपाययोजना आखायला सुरुवात केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. ओमायक्रॉनचे संकट लक्षात घेऊन राज्यांनी त्या-त्या ठिकाणी आयसोलेशन बेड्स, अॅम्ब्युलन्सची संख्या, औषधांची उपलब्धता तसेच आवश्यक मनुष्यबळाची तयारी शक्य तितक्या लवकर करण्याच्या सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत. 


राज्यांना काय सूचना दिल्या आहेत? 
केंद्रीय आरोग्य सचिवांकडून सर्व राज्यांना पत्र लिहित आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युरोप आणि अमेरीका सारख्या विकसित भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गोष्ट लक्षात ठेऊन भारतातही खबरदाचीच्या उपाययोजना कराव्यात असं या पत्रात म्हटलं आहे. तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करा, सोबतच अस्थायी रुग्णालयांची निर्मिती करा. यासाठी सीएसआयआर, डीआरडीओ, प्रायव्हेट सेक्टर, आणि एनजीओसारख्या संस्थांची मदत घेतल्यास लवकर निर्माणकार्य पूर्ण होऊ शकेल असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.  


सर्व होम आयसोलेशन असलेल्या केसेस निगराणीखाली ठेवत विशेष टीमची निर्मिती करा, रुग्णांच्या मदतीसाठी कॉल सेंटर आणि कंट्रोल रुम रुग्णांसाठी सज्ज ठेवा. सोबतच जर एखाद्या रुग्णाला लक्षणे आढळली तर त्याच्या मदतीसाठी ॲंम्ब्युलन्सची व्यवस्था होईल अशी यंत्रणा देखील तयार करा असे निर्देश देण्यात आले आहेत. 


सर्व राज्यांनी जिल्हा स्तरावरील, वॉर्ड स्तरावरील नियंत्रण कक्ष सक्षम आणि क्रियाशील बनवा. टेस्टींग, ॲम्ब्युलन्स, रुग्णालयातील बेड्स मोठ्या प्रमाणात ठेवण्याची व्यवस्था करा.कोव्हिड समर्पित आरोग्य सोयीसुविधांचा विचार करा. ग्रामीण भाग आणि बालरोगविषयक प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करा. राज्यांनी राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना आवश्यक ती रसद पुरवण्याचं केंद्रानं आवाहन केलं आहे.


संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना, सोबतच क्वारंटाईन सुविधांचेही नियोजन संपूर्ण राज्यभर पुरेशा प्रमाणात करा असंही या पत्रात म्हटलं आहे. 


दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या मुद्यावर केंद्राने प्रत्येक राज्यांनी कोरोनाचे चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीपीसीआर तसेच रॅपिड आणि अॅन्टिजेन टेस्ट करण्याच्या सूचना देखील केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :