मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून , भाजपने 19 पैकी 11 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. यानंतर राजकीय नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगल्याचं चित्र पाहायला मिळतय. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात तर मालवणी भाषेतच कलगीतुरा रंगला आहे. नेमकं काय म्हणालते दोन्ही नेते ते पाहुयात...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांचे वर्चस्व पणाला लागले होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. अखेर यामध्ये भाजपनं आपला झेंडा रोवला आहे. या भाजपच्या विजयाबद्दल बोलताना शेलार यांनी मालवणी भाषेत ट्वीट केले आहे.
देवानं साथ सोडल्याने आणि विधानपरिषदेची एक जागा गमावल्यानंतर सिंधुदुर्गात महाविकास आघाडीचा भोपळा फुटला आहे, अशा शब्दात शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा लगावला आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत! असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.
तर आशिष शेलार यांच्या या ट्वीटवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनीदेखील मालवणी भाषेत ट्वीट करत शेलार यांच्यावर चांगलाच निशाणा लगावला आहे.
शेलार अर्ध्या हळकुंडाने किती पिवळे होणार? एक जिल्हा बँक निवडणूक जिंकलास म्हणून आम्हाला काही फरक पडत नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. तुम्ही कितीहा हातपाय आपटले तरी पुढचे 25 वर्ष राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच असेल. तुम्ही वाट बघा. तुमच्या भ्रमाचा भोपळा तुमच्याच डोक्यावर फुटेल असे ट्वीट करत सावंत यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेनुसार सुरुवात भाजपाच्या विजयाने झाली आहे. 19 पैकी 11 जागांवर आमचं वर्चस्व कायम राहिलंय. सत्तेच्या जोरावर सुरू असलेलं राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणेजी आणि आमदार नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने चाललेल्या कारवायांना ही सणसणीत चपराक असल्याचे पाटील म्हणालेत.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून 11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विजय साजरा करण्यासाठी कोकणात जाणार असल्याची देखील माहिती आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपनं झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व मिळवलं आहे.
महत्ताच्या बातम्या:
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची पाच महत्वाची वैशिष्ट्यं; सविस्तर निकाल पाहा एका क्लिकवर
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका, कार्यकर्त्यांचा जल्लोष