(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : जर तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार; संजय राऊतांचा भाजपला इशारा
Shivesna : मुंबईमध्ये शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
मुंबई: आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले, पण आपण नैतिकता सांभाळत बसलो, पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत आयोजित केला होता. त्यामध्ये ते बोलत होते.
बाळासाहेबांची पिढी गरम रक्ताची होती, ती जपली पाहिजे असं सांगत संजय राऊत म्हणाले की, "सोशल मीडिया हा विषय माझा नाही. सोशल वर्क तसं सोशल मीडिया करा. यामध्ये खूप तांत्रिक गोष्टी आहेत. मला इंग्लिश येत नाही, मी मराठीत लिहितो, सामना मराठीत निघतो पण देशभरात बातमी होते. शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्यावेळी सोशल मीडिया कुठे होती? हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांना देखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेन्ट हिटलर करायचा, त्याचप्रकराचरे इव्हेन्ट आता मोदी करत आहेत. मी टीका करत नाहीय. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी अमित शहा यांनी काय सांगितलं तर मला 1 कोटी लोक सोशल मीडियासाठी पाहिजे आहेत. कोणत्या पोस्ट करायच्या, ममता विरोधात कसा हल्ला करायचा हे रोज 50 लाख लोकांपर्यंत पोहचायचं."
आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हे आपला पहिला पराभव असेल असं खासदार संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, "आपल्या समोरचे लोक सोशल मीडियाचा वापर किती सिरियसली करत आहेत. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकी आधी मुस्लिम हिजाब प्रकरणावर सोशल मीडियाचा वापर केला गेला. सैन्य पोटावर चालतं, पण आमची एक पिढी वडापाववर लढत होती. आपण भाजपकडून ही सत्ता खेचून आणली आहे. माझ्यासारखे हजारो लोक तयार झाले पाहिजे. मी रोज सकाळी बोलतो पण माझा नाईलाज आहे. नाहीतर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही."
राहुल गांधींना फेल करण्यात भाजपच्या सोशल टीमचा हात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फेल करण्यात भाजपच्या सोशल टीमचा हात असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, "राहुल गांधी यांनी नक्कीच चूक केली. राहुल गांधीना फेल करण्यात जर कोणाचा हात असेल तर भाजपच्या सोशल टीमचा आहे. त्यांनी राहुल गांधी हे मौनी बाबा आहेत असं नॅरेटिव्ह सेट केलं. सर्वात जास्त पैसै भाजप आयटी सेलवर खर्च केले गेले. शिवसेनेवर बोलायला माणसं ठेवली आहेत. हे पैसै कसे येतात?"
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली. मी पुन्हा एकदा सांगतो, बाप-बेटे जेलमध्ये जाणार असं ते म्हणाले.