(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रिये विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी, लिखित स्वरूपात बाजू मांडण्याचे आदेश
High Court : चिन्ह गोठवण्याच्या विरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीत आज ठाकरे गटानं आपल युक्तिवाद केला.
मुंबई : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रिये विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) याचिकेवर दिल्ली हायकोर्टात (High Court) उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे कोर्टाने आज आदेश दिले आहेत. तीन पानांमध्ये संक्षिप्तपणे आपला रिप्लाय देण्याचा कोर्टाने आदेश दिले आहेत.
चिन्ह गोठवण्याच्या विरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीत आज ठाकरे गटानं आपल युक्तिवाद केला. "निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीने नियमांचे पालन केलं नाही. दोन बाजूंमध्ये डिस्प्युट आहे, हे ठरवण्याआधी तो नेमका कशा पद्धतीचा आहे हे विचारात घ्यायला पाहिजे होतं. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना चिन्हाचा निर्णय कसा काय होऊ शकतो? हा माझा, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष. अपात्रते संदर्भात भविष्यात काही निर्णय विरोधात लागला तर दरम्यानच्या काळात आमचं भरून झालेले नुकसान कसं आणि कोण भरून देणार? पोटनिवडणूक तोंडावर होती म्हणून चिन्ह गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला. समोरचा पक्ष तेव्हा पोटनिवडणूक लढायची आहे असे सांगत होता. पण लढला नाही. आता ही पोटनिवडणूक संपली आहे, ज्या उद्देशाने तात्पुरता निर्णय दिला तो निकाली निघाली. आता निवडणूक आयोगाने स्थिती पूर्ववत करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात केली आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रथमदर्शनी सुनावणीशिवाय आणि एकूण प्रकरणावर कोणतीही चर्चा न करता घेतल्याचाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने कोर्टात देखील हा मुद्दा उपस्थित केला.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी अंतरिम आदेश देऊन दोन्ही गटांना 'शिवसेना' पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी हा आदेश दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत.
महत्वाच्या बातम्या