एक्स्प्लोर
निष्ठावंत शिवसैनिकांचा राजीनामा हाच आरक्षणावर जालिम उपाय : अशोक चव्हाण
सांगलीतील पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरुन शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. शिवाय निष्ठावंत शिवसैनिकांनी राजीनामे द्यावेत, असंही ते म्हणाले.

सांगली : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला डिवचलं. निष्ठावंत शिवसैनिकांनी राजीनामे द्यावेत, म्हणजे किमान सरकार पडण्याच्या भीतीने तरी आरक्षण मिळेल, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सांगलीत पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत आता चर्चेचं गुऱ्हाळ नको आहे. मागील मोर्चावेळीही अशी चर्चा झाली, मात्र प्रत्यक्षात काही झालं नाही. लोकांना आता चर्चा नको, निर्णय हवाय, असं असताना आंदोलकांवर पोलिसांकडून लाठ्या चालवल्या जात आहेत, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी अशोक चव्हाण यांनी आरक्षणावरुन शिवसनेनेलाही डिवचलं. ''मुख्यमंत्री आरक्षणाच्या बाबतीत अजून वेळकाढूपणाच करणार आहेत का? मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट केव्हा येईल, अधिवेशन केव्हा होईल यापेक्षा खऱ्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी जर पाठिंबा काढला, राजीनामे दिले तर क्षणभर सरकार राहणार नाही. सरकार राहणार नाही या भीतीने तरी आरक्षणाचा निर्णय होईल आणि हाच यावर जालिम उपाय आहे,'' असं चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर निशाणा ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत प्रचारासाठी येत नाहीत, किंबहुना ते येऊ शकत नाहीत. लोकाशी थेट संवाद साधू शकत नाहीत, सोशल मीडियातून आपल्या पक्षाची भूमिका मांडावी लागत आहे. ते साधे प्रचारासाठी बाहेर पडू शकत नाहीत, पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेसाठी जाऊ शकत नाही यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे समजते,'' असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
निवडणूक
निवडणूक























