(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut | केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यामातून राज्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : संजय राऊत
मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? असा सवाल रोखठोकमधून विचारण्यात आला आहे.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यानंतर मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू आणि याप्रकरणाची माहिती सर्वात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचणे, या संपूर्ण प्रकरणाची माहिती या सरकारसाठी शुभ संकेत नाहीत. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे. संजय राऊत यांनी रोखठोकमधून विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात.
रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलंय?
विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या मते गाडीचा मालक मनसुख व सचिन वाझे हे चार महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी श्री. फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले?
Sachin Vaze Arrested : ॲंटिलिया स्फोटक प्रकरण ते सचिन वाझेंची अटक... जाणून घ्या घटनाक्रम
...तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले
मुंबई-ठाण्याचे पोलीस व पोलिसांचा एक गट चालवणारी बाहय़ शक्ती गुंतली आहे. यातून पोलीस दलातील ‘गटबाजी’ व सौम्य टोळीयुद्ध पुन्हा उसळू लागले तर ते बरे नाही. पोलिसांनी भ्रष्टाचार करावा, पैसे गोळा करावेत, प्रोटेक्शन मनी घ्यावा यात आता काही नवीन राहिलेले नाही. देशभरातील पोलीस दलाची हीच कार्यपद्धती आहे असे लोक गृहीत धरूनच चाललेले असतात, पण पोलिसांत हिंसा, खंडणीखोरी व प्रसंगी अमली पदार्थांच्या व्यवहारातही पैसे मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली तर देशच संकटात येईल. एखाद्या खोट्य़ा प्रकरणाचा डोलारा उभा करायचा व त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे. पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. म्हणून मुंबई पोलिसांनी तोंड काळे केले असे वक्तव्य श्री. फडणवीस यांनी केले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरण प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?
Sachin Vaze Arrested : अखेर सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?
राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न
मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे. सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी? केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे म्हणून हे घडू शकले! महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे. अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी व त्या गाडीचा मालक मनसुख याच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी बऱ्यापैकी वाजवले. काही दशकांपूर्वी त्यावेळचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी किणी या इसमाच्या मृत्यूचे प्रकरण असेच रहस्यमय बनविले होते. भुजबळ तेव्हा किणी प्रकरणाचे तपास अधिकारीच झाले होते. किणी या मृताचा मेंदूही चोरण्यात आला असा भन्नाट आरोप करण्यापर्यंत किणी प्रकरण पोहोचले होते. ते प्रकरणसुद्धा पोकळ पुराव्यांवरच उभे होते व शेवटी ते कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल.
संबंधित बातम्या