Karnataka Hijab Row: शाळेमध्ये शाळेच्या गणवेशाव्यतिरिक्त कोणताही पोशाख नसावा: आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray: शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक गोष्टींना स्थान नसावे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई: कर्नाटकातील हिजाब प्रकरणी देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आता यावर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळांमध्ये शाळेच्या गणवेशाच्या व्यतिरिक्त कोणताही गणवेश नसावा असं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, "जर शाळेमध्ये गणवेश बंधनकारक असेल तर त्या ठिकाणी इतर कोणत्याही पोशाखाला जागा नसावी. त्या ठिकाणी शाळा वा महाविद्यालयं व्यवस्थापनेने सांगितलेला गणवेश बंधनकारक असावा. शाळा अथवा महाविद्यालयं ही शिक्षणाची केंद्र आहेत, त्याच ठिकाणी फक्त आणि फक्त शिक्षणालाच स्थान आहे." शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक गोष्टींना कोणतेही स्थान नसावे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कर्नाटकातील हिजाबचा वाद आता न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. आता हिजाब प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे.
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण तापलंय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत. कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
- Karnataka Hijab Row : पुढील निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
- Hijab Controversy : हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...
- Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाबबंदीच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न; माकपचा आरोप