पोलिस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात, स्वागताला उदयनराजे; 'या' 4 शहरांत ठेवणार
हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी ठेवा आहे.
सातारा : अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivajia Maharaj) ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. त्यानंतर, स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा (Satara) जिल्ह्यात आता ही वाघनखे नेण्यात आली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखे (Waghnakhe)भारतात कधी येणार याची उत्कंठा आता संपली असून विशेष विमानाने ती आज सकाळी मुंबईत पोहोचली.
हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी ठेवा आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही 16 व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असेलल्या शिवरायांच्या वाघनखांचं आज लंडनहून भारतात आगमन झालं आहे. ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता सातारा जिल्हा हद्दीत दाखल झाली आहेत. आयशर गाडीतून ही वाघनखे पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यात या वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील, मंत्रिमंडळातील कोणी उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे. 19 तारखेला ढोल-ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सर्व सातारकरांना ही वाघनखे पाहाता येणार आहेत.
4 शहरांत दाखल होणार
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे राहतील, ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं सध्या ठरलं आहे. मात्र, याचं नियोजित वेळापत्रक अजून ठरलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत बोलून हे वेळापत्र निश्चित केलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
19 तारखेला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
शुक्रवारी सकाळी 11 वाजता सातारा येथे वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल, या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात प्रतापगड विकास प्राधिकरणाची घोषणा केली जाईल, मुख्यमंत्री याची घोषणा करतील, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.