Uddhav Thackeray: कर्नाटकात मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली...लोकांनी सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना; उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार
Uddhav Thackeray: आदिपुरुष चित्रपटातील संवादाचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला...
Maharashtra Politics Uddhav Thackeray: कर्नाटकची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. मोदींनी बजरंग बली की जयची घोषणा दिली. तरीदेखील लोकांनी तुमच्या सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना...अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena Thackeray Faction) राज्यस्तरीय शिबीर वरळीमध्ये पार पडले. त्यावेळी समारोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल केला.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले, गृहमंत्री अमित शाह यांनी मला नांदेडमधील सभेत काही प्रश्न विचारले होते. पण, तुम्हाला अदानींवरून प्रश्न विचारले तर तुमची बोबडी वळते. राहुल गांधींची खासदारकी काढली. त्यांना घर रिकामे करण्याचे आदेश दिले. शाह यांनी आम्हाला काश्मीरसाठी असलेले विशेष कलम 370 रद्द करण्याच्याबाबत भूमिका विचारली. 370 रद्द केल्यानंतर त्याचे स्वागत करणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता. कलम 370 रद्द झाल्यानंतर सहा वर्षानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका का नाही? आजही काश्मीरमध्ये हिंदूच्या हत्या का होत आहेत, काश्मीर खोऱ्यात हिंदूंचे पुनवर्सन का नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवाच....
पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याचा वापर करून निवडणूक जिंकल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जात आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. कर्नाटकात मोदींचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली ना...बजरंग बली की जय म्हटलं... काय झालं त्या निवडणुकीत...सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना... अशी बोचरी टीका उद्धव यांनी केली. पंतप्रधान मोदी अमेरिकेत चाललेत पण मणिपूरमध्ये जात नाहीत. मोदींनी मणिपूर शांत करुन दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले.
महिला शिवसैनिकांवर हल्ला केल्यास...
उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले की, जीवाला जीव देणारे लढवय्ये शिवसैनिक लाभले आहेत. तुमच्या सहकार्यावर संकटावर मात करू. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विनाकारण कोणावर हात उगारण्यास सांगितले नाही. पण जे हात उगारतील त्यांना धडा शिकवा, असे सांगितले होते. आता, महिला गुंड तयार झालेत. ठाण्यात अयोध्या पोळ आणि त्याआधी शिंदे या महिला शिवसैनिकांवर हल्ले झालेत. या पुढे महिला शिवसैनिकांवर हल्ला झाल्यास हल्लेखोरांचे हात जागेवर ठेवणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.