(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'चंद्रकांत पाटील निरागस आणि निष्कपट, लहान मुल बडबड करतं तसा आनंद घ्यायचा' : संजय राऊत
चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मुलं कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा असतो, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
धुळे : चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत, विशेष लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मुलं कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा असतो, असा शब्दात फिरकी घेतशिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या 'आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही' या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशानं पाहिलं आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून कळतंच. या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलं सुद्धा आहे, असं राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही पिंजऱ्यातील वाघाशी नव्हे तर जंगलातील वाघाशी मैत्री करतो. राऊत म्हणाले की, हे सरकार 5 वर्ष टिकेल. लोकसभा, विधानसभा देखील लढवू. प्रत्येकाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. नाना पटोलेंना वाटते की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा त्यात गैर नाही, असंही राऊत म्हणाले.
नवी मुंबईच्या नामकरणाच्या वादावर बोलताना राऊत म्हणाले की, नवी मुंबई विमान तळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. दि बा पाटील हे देखील लढवय्ये नेते होते. त्यांच्या स्मरणार्थ देखील स्मारकाचा विचार व्हावा, असं राऊत म्हणाले.