'फिल्म लंबी चलेगी! नवाब मलिकांचा इंटरव्हल लांबतोय, नंतर माझी एन्ट्री', संजय राऊतांचा पुनरुच्चार
नवाब मलिक हे न्यायाची लढाई लढत आहेत.मलिक यांचा इंटरव्हल लांबतोय, मी एन्ट्री करणार आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
औरंगाबाद : नवाब मलिक (Nawab Malik) हे न्यायाची लढाई लढत आहेत. ते संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं लढत आहेत. त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. आमच्यासारख्या काही लोकांना वाटत होतं की हे सगळं थांबावं पण भाजपला जर शहाणपणा येत नसेल तर ही लढाई सुरु राहिल. अजून काहीच समोर आलेलं नाही. नवाब मलिक यांचा इंटरव्हल लांबतोय, मी एन्ट्री करणार आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
कंगनाबेनचं डोकं का बधीर झालं हे NCBचे वानखेडेच शोधू शकतील! शिवसेनेचा टोला
लढण्यासाठी भाजप कधीच स्वत:चं हत्यार वापरत नाही, त्यांच्याकडे स्वत:चं हत्यारच नाही- संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, भाजप लढण्यासाठी कधीही स्वत:चं हत्यार वापरत नाहीत. त्यांच्याकडे स्वत:चं हत्यारच नाही. ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. खांदेही पिचलेले असतात. खांदेही मजबूत नसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरतो. कधी बॉम्ब फोडणार म्हणतात, पण लवंगी फटाकाही फुटत नाही. कधी ईडी-सीबीआयच्या घोषणा करतात. पण तिथूनही काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला विरोध केला जातो. शिवसेना हा एक हत्ती आहे. हत्ती चालत असतो. पण पाठीमागून कोण भुंकत असतो, त्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
एसटी संपाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, एसटी कामगारांचा प्रश्न फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून तापलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यावर मत व्यक्त केलं आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर घोडं अडलेलं आहे. अनिल परब यांनी अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. पण राज्यातल्या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची आहे.
ते म्हणाले की, एसटी कामगारांचा संप जे चिघळवत आहेत, ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा आणि श्रमाचा मुंबईत कायम तिरस्कार वाटला, ते आज कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत रस्त्यावर उतरत आहेत याचं आश्चर्य वाटतंय मला. मुंबईतला कष्टकरी कायम शिवसेनेसोबत राहिला आहे. त्यांना भडकवण्याचे कोणतेही प्रयोग यशस्वी होणार नाहीत. शरद पवार देखील यात लक्ष घालत आहेत. राज ठाकरे देखील याविषयी प्रयत्न करू इच्छित असतील, तर त्यांचं स्वागत आहे, असं राऊत म्हणाले.
सामनाच्या (Shiv Sena Saamana) अग्रलेखातून कंगनावर टीका
'खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं' असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) सर्व स्तरांतून टिकेची झोड उठली आहे. आज शिवसेनेनं सामनाच्या (Shiv Sena Saamana) अग्रलेखातून कंगनावर टीका केली आहे. सोबतच भाजप नेत्यांनाही फैलावर घेतले आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही, असं लेखात म्हटलं आहे.